अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा ट्रम्प सरकारविरोधात खटला, बेकायदेशीरपणे व्हिसा रद्द केल्याचा आरोप
अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अचानक हजारो परदेशी विद्यार्थ्यांचे F-1 व्हिसा रद्द केले आहेत. या निर्णयानंतर हिंदुस्थानी आणि चिनी विद्यार्थ्यांनी मिळून ट्रम्प सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभाग (DHS) आणि इतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने (ACLU) न्यू हॅम्पशायरच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय एकतर्फी आणि बेकायदेशीर आहे. ज्यामुळे त्यांना शिक्षणाचा, भविष्यातील नोकऱ्यांचा आणि अमेरिकेत कायदेशीर वास्तव्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. एसीएलयूने याबाबत म्हटले आहे की, हे प्रकरण केवळ या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही तर, ते अमेरिकेत राहणाऱ्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे.
अमेरिकेत ज्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द झाले त्यापैकी 50 टक्के हिंदुस्थानी विद्यार्थी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अमेरिकन सरकारने अनेक परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिसा रद्द करण्याबाबत ईमेल पाठवले आहेत. या मेलमध्ये या विद्यार्थ्यांना अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले होते. यापैकी 50 टक्के विद्यार्थी हिंदुस्थानी आहेत, असं सांगण्यात येत आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशननेने (AILA) अशा 327 विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली आहे. यापैकी 50 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी हिंदुस्थानी आहेत. हिंदुस्थानानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात 14 टक्के विद्यार्थी चिनी आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List