संसारातील टोमणे दैनंदिन जीवनाचा भाग; सुप्रीम कोर्टाचा सासू-सासऱ्यांना दिलासा
अनेक विवाहित महिलांना सासरी वारंवार टोमणे ऐकावे लागतात. अशा टोमण्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला सासरच्या लोकांकडून मारले जाणारे काही टोमणे हे दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत. कुटुंबाच्या सुखासाठी त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि टोमणे मारणाऱ्या सासू-सासऱ्यांविरोधातील गुन्हा रद्द केला.
गुजरातमधील हे प्रकरण आहे. 2005 मध्ये लग्न झालेल्या दाम्पत्यामध्ये वाद झाला होता. लग्नानंतर काही दिवस दोघांनी सुखाने संसार केला होता. मात्र मतभेद झाल्यानंतर पतीने घटस्फोटासाठी खटला दाखल केला. नंतर तीन दिवसांतच महिलेने पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार केली. त्यावर पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
विवाहिच्या पगारातील पैशांची मागणी केली जात होती. त्या पैशांसाठी तिला छळले जात होते. आपल्याला सासू-सासरे सतत टोमणे मारून मनस्ताप देत असल्याचा आरोप विवाहितेने केला होता. या आरोपावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 498A व 411 अंतर्गत गुन्हा नोंदवला. तो गुन्हा रद्द करण्याची सासरच्या लोकांची विनंती गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
गुजरात उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला सासरच्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांनी निकाल दिला.
लग्न होऊन काही वर्षे उलटल्यानंतर वैवाहिक वादाची प्रकरणे दाखल केली जातात. त्यामुळे न्यायालयांनी आरोपांमध्ये नेमके तथ्य किती आहे, हे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे काळजीपूर्वक विचारात घेतले पाहिजे. महिलेने सासरच्या लोकांनी टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मात्र त्या टोमण्यांबद्दल विशिष्ट तपशील दिलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
वास्तविक संसारात मारले जाणारे काही टोमणे हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे. कुटुंबाच्या सुखासाठी त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेला गुन्हा रद्द केला. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयातील त्रुटींवर बोट ठेवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List