अलिबागच्या अविनाश ओक आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार, कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर वृद्धाचे आंदोलन
अलिबाग येथील प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजपचे नेते किरीट सोमय्या हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आशीष करंदीकर यांनी केला आहे. याप्रकरणी सोमय्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी करंदीकर यांनी आज मंत्रालयासमोर आंदोलन केले.
आशीष करंदीकर यांनी आज दुपारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर हाती फलक घेऊन आंदोलन केले. अविनाश मनोहर ओक हे अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि रायगडच्या जनशिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी पेण रेल्वे स्थानक येथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. किरीट सोमय्या हे ओक यांचे चुलत मेहुणे लागतात. ओक यांची आत्महत्या नसून हत्या आहे आणि त्याला किरीट सोमय्या जबाबदार आहेत असे सांगतानाच, सोमय्यांवर तत्काळ कारवाई व्हावी यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे करंदीकर प्रसारमाध्यमांची बोलताना म्हणाले.
सोमय्यांचा पोलिसांवर दबाव, हे दुसरे बीड प्रकरण
ओक यांच्या आत्महत्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. हे दुसरे बीड प्रकरण आहे. सोमय्या भाजपचे नेते असल्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत. सोमय्यांविरुद्ध याप्रकरणी आपण खून, खंडणी, अपहरणाचीही तक्रार पोलिसात केली; पण सोमय्यांच्या दबावामुळे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही, असाही आरोप करंदीकर यांनी केला. करंदीकर माध्यमांशी बोलत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संविधानाने मला दिलेला बोलण्याचा अधिकारदेखील हिरावून घेतला जातोय, असा संताप यावेळी करंदीकर यांनी व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List