एक रुपयात पीकविमा योजनेते अनेकांनी चुना लावला, अजित पवार यांचं खळबळजनक वक्तव्य
एक रुपयामध्ये पीकविमा योजनेमध्ये अनेकांनी आम्हाला चुना लावला, असं खळबळजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील दिशा कृषी उन्नतीच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही मागं एक रुपयामध्ये पीकविमा देण्याचं चालू केलं होतं. ती योजना आमची अडचणीत आली आहे. त्यामध्ये खूप लोकांनी, आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुना लावला. ते नंतर आम्ही सगळं काढलं आहे. आम्ही आता जे तुमच्या भल्याचं असेल, तेच करणार आहोत. त्या करता मुख्यमंत्री, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, एकनाथ शिंदे, मी आणि रस्तोगी आम्ही एक मिटिंग घेतली आहे. त्यामध्ये नवीन कल्पना, काही चांगला कार्यक्रम आम्ही तुम्हाला देणार आहोत.”
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत एक रुपयातं पीक विमा योजना आणली होती. या योजनेत अनेक गैरव्यवहार झाले म्हणून सरकारला ही विमा योजना आता मागे घ्यावी लागली आहे. मे महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे, त्यापूर्वी सरकार नवीन योजना आणणार, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज फेडायचे आवाहन केले होते. तसेच सध्या कुठलीही कर्जमाफी होणार नाही, असे जाहीर केले होते. सरकारने केलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवू नका आणि कर्ज फेडून टाका असेही अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर पीकविमा योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आर्थिक वर्षात राज्याची महसूली तूट ही 1.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. ही योजना बंद झाल्याने यामुळे सरकारचे 7 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. राज्याच्या कृषी विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक सादरीकरण दिले होते. त्यानंतर ही योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे आणि बोगस दावे केल्याचे समोर आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List