विलेपार्ले जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम तूर्तास पाडू नका, हायकोर्टाने महापालिकेला बजावले
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर निर्दयपणे बुलडोझर चालवणाऱया पालिकेला मुंबई हायकोर्टाने दणका दिला. कारवाई केलेल्या जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम पाडू नका असे बजावत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती ’जैसे थे’ ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने प्रशासनाला दिले व सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब केली.
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराला पालिकेने एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटीस बजावली याप्रकरणी ट्रस्टने शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली. शहर दिवाणी न्यायालयाने ट्रस्टला दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पालिकेने शहर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत मंदिरावर मुजोरपणे कारवाई केली. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पालिकेला परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देत तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश पालिकेला दिले.
न्यायालय काय म्हणाले…
ट्रस्टला अंतरिम दिलासा देतानाच न्यायालय म्हणाले की, पालिकेच्या कारवाईविरोधातील अर्ज फेटाळण्यामागील नेमकी कारणे काय आहेत ते जाणून घेण्याचा याचिकाकर्त्यांना अधिकार आहे. याशिवाय, या कारवाईविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलावर सुनावणी व दिवाणी न्यायालाचा आदेश उपलब्ध होईपर्यंत, अपिल ऐकले जाईपर्यंत याचिकाकर्ते अंतरिम दिलासा मिळण्यास पात्र आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List