चीन हॉलीवूडला शिकवणार धडा, टॅरिफ वॉर’ पोहोचले थिएटरमध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 145 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनने आता हॉलीवूडच्या चित्रपटांना टार्गेट केले आहे. देशात आयात होणाऱ्या अमेरिकन चित्रपटांची संख्या कमी करण्याचा चीनचा विचार आहे. यामुळे हॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे. चीन दरवर्षी 10 हॉलीवूड सिनेमा आयात करते. सध्याच्या टॅरिफ वॉरमुळे चीनमध्ये अमेरिकन सिनेमांची मागणी कमी होईल, असा अंदाज व्यक्त होतोय. या पार्श्वभूमीवर ‘आम्ही बाजार नियमांचे पालन करू, प्रेक्षकांच्या आवडीनिवडींचा आदर करू आणि आयात केलेल्या अमेरिकन चित्रपटांची संख्या कमी करू,’ असे नॅशनल फिल्म अॅडमिनिस्ट्रेशनने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.
एकेकाळी चीनमध्ये हॉलीवूड सिनेमांचा मोठा प्रेक्षकवर्ग होता. हॉलीवूड स्टुडियोंसाठी चीन ही मोठी बाजारपेठ होती. मात्र कालांतराने चीनमध्ये देशांतर्गत सिनेमा व्यवसायाने भरारी घेतली आणि चिनी प्रेक्षकांनी हॉलीवूडला मागे टाकले. आता चीनच्या बाजारपेठेत एकूण बॉक्स ऑफिस कमाईत अमेरिकन चित्रपटांचा वाटा फक्त 5 टक्के आहे. हॉलीवूडसाठी वाईट गोष्ट म्हणजे, कोणताही महसूल अमेरिकेत परत जाण्यापूर्वी चीन 50 टक्के इतका कर आकारतो, असे लेखक क्रीस फेंटन यांनी सांगितले. हॉलीवूड स्टुडिओंना चीनच्या बॉक्स ऑफिसच्या फक्त 25 टक्के कमाई मिळते. हॉलीवूडला बिजिंगने अशी हाय प्रोफाईल शिक्षा केलेली आहे, जी वॉशिंग्टनला नक्कीच लक्षात राहील, असे फेंटन म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List