Phule Movie- कथानकाची गरज असेल तर, दृश्ये वगळण्याची काहीच गरज नाही! गार्गी फुले यांचे परखड मत

Phule Movie- कथानकाची गरज असेल तर, दृश्ये वगळण्याची काहीच गरज नाही! गार्गी फुले यांचे परखड मत

>>> प्रभा कुडके  

थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला सर्वात आधी ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यामुळे या चित्रपटाचे जयंतीनिमित्तचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत जवळपास 12 दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटासंबंधित सर्वांचाच आणि जनमानसाचा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे.  

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या खापर खापर पणती म्हणजेच निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांनी ‘सामना आॅनलाईन’ सोबत संवाद साधला. सध्याच्या घडीला ‘फुले’ चित्रपटाबद्दल जे काही घडत आहे ते खेदजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, कलेच्या क्षेत्रात ‘जात’ कशी काय येते याचाच राग येतोय. कलाक्षेत्र हे जातीवादाला बळी पडत आहे ही खेदाची बाब आहे.  घडत असलेल्या एकूणच विषयावर भाष्य करत असताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाईंनी त्याकाळी घेतलेला हा धाडसी निर्णय होता, पण पतीने दिलेली खंबीरपणे साथ या गोष्टी खूप काही सांगून जातात.

 

गार्गी फुले यांच्या घरी लहानपणापासूनच महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या विचाराचं बाळकडू हे मिळालं होतं. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले हे गार्गी यांचे वडिल त्यामुळे अभिनयाच्या जोडीला समाजात पूर्वजांच्या कामाविषयी विषय रंगायचे. ‘फुले’ चित्रपटाला होणारा विरोध आणि त्यातील काही दृश्ये वगळण्यावर त्या म्हणाल्या, एखादे दृश्य कथानकाची गरज असेल तर ते वगळून कसं चालेल. कथा जिवंत होण्यासाठी समर्पक दृश्य ही गरजेची आहेत.

 

लहानपणापासून आम्ही महात्मा फुले यांचे वंशज आहोत हे बाळकडू अगदी घरातूनच मिळालं होतं. आपल्या पूर्वजांनी इतकं महत्त्वाचं कार्य करुन ठेवलं आहे याचा कायम अभिमान वाटत आलाय असं गार्गी यावेळी म्हणाल्या. याविषयावर अधिक भाष्य करताना त्या म्हणाल्या, सध्याच्या घडीला आडनावावरुन जातीला टारगेट करण्याची खूप वाईट वेळ आलेली आहे. आम्ही लहान असताना, ब्राम्हणांच्या घरात पुरणपोळी खायचो तेही आमच्याकडे येऊन बिनधास्त जेवायला बसायचो. कोण शेख, कोण भोसले, कोण जोशी आम्ही सर्वच एक होतो. परंतु आत्ता मात्र जातीवरुन फारच ऊहापोह समाजात पाहायला मिळत आहे ही खरोखर खेदाची बाब आहे. 

 

महात्मा फुले हे ग्रेट होतेच. परंतु त्या काळात एका स्त्रीने शाळा काढणं हे त्याहुनही महत्त्वाचं होतं आणि आहे. त्यामुळे त्याकाळी विरोध हा होणारच होता. मग चित्रपटात हे दाखवणार असतील तर नेमकं चुकीचं काय आहे. जनभावना आणि समाजमन जपूनच चित्रपटातील गरजेच्या दृश्यांना न्याय मिळायला हवा असं मत गार्गी याचं आहे.  

 

सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा त्यातील काही ठराविक दृश्यांवर आक्षेप घेण्याआधी हा विचार करायला हवा की, सत्य बदलत नाही. आपल्याकडे कुठल्याही चांगल्या गोष्टीला हा समाजविरोध होतोच. त्या काळात तर हा विरोध होणं स्वाभाविक होतं, परंतु याचा अर्थ असा नाही की सत्य बदलतं!

मी कलाक्षेत्रात कार्यरत असून, आजही माझ्या पूर्वजांच्या नावाला आणि माझ्या बाबाच्या म्हणजेच निळू फुले यांच्या नावाला धक्का लागेल असं काम केलं नाही. माझे खापर खापर पणजोबा महात्मा फुले एवढी ग्रेट व्यक्ती होते याबद्दल कायमच अभिमान वाटत आलेला आहे. निळू फुले यांची मी मुलगी आहे हा अभिमान कायमच वाटत आलेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा