Waqf Law 2025 – पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारात तिघांचा मृत्यू, 110 जणांना अटक; ममतादीदींचं शांततेचं आवाहन
वक्फ विधेयक विरोधातील आंदोलनाला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये पुन्हा हिंसक वळण लागले. या हिंसाचारात तीनजणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 110 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
मुर्शिदाबादच्या जंगीपूर, सुती, धुलियान, शमशेरगंज आणि जाफराबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयक विरोधात आंदोलन सुरू आहे. अशातच एका घरातील बाप-लेकाची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. मुर्शिदाबादच्या शमशेरगंजमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना सतत फोन करूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मृतांची नावं हरगोविंद दास ( वय 74) आणि चंदन दास ( वय 40 ) अशी आहेत.
सुतीमध्ये साजूर चौकात गोळी लागून एक तरुण जखमी झाला होता. त्याचा मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृताचे नाव एजाज अहमद (वय 21 ) असे आहे.
तर हिंसाचार का होत आहे? – ममता बॅनर्जी
राज्यात हा कायदा लागू होणार नाही तर हिंसाचार का होत आहे? असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत जनतेला संदेश दिला आहे. ज्या कायद्याबद्दल बोलले जात आहे तो केंद्र सरकारने बनवला आहे, राज्य सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही त्या कायद्याचे समर्थन केले नाही आणि तो बंगालमध्ये लागू केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांचा केंद्राशी पंगा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List