पवन कल्याण यांचा मुलगा शाळेतल्या आगीत जखमी; उपमुख्यमंत्र्यांसह चिरंजीवी भेटीसाठी रवाना
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर शाळेतल्या आगीत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पवन कल्याण यांच्यासह त्यांचा भाऊ, मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हे तिघं सिंगापूरला रवाना झाले आहेत. मार्क शंकरवर सध्या सिंगापूरमधल्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला भेटण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा विमानाने हे तिघेही सिंगापूरला गेले आहेत. पवन कल्याण यांनी काल रात्री माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आगीनंतर बराच धूर श्वसनावाटे शरीरात गेल्याने मुलाची ब्रॉन्कोस्कोपी केली जाणार आहे. पवन कल्याण, चिरंजीवी आणि सुरेखा यांना मंगळवारी रात्री हैदराबाद एअरपोर्टवर पाहिलं गेलं. माध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी असंही सांगितलं की, मुलगा जखमी झाल्याची माहिती मिळाल्यापासून ते आणि त्यांची पत्नी ॲना लेझनेवा प्रचंड घाबरलेले आहेत.
पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर हा सिंगापूरमधील शाळेत शिकत असून तिथे लागल्या आगाती त्याच्या हाताला आणि पायांना दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. “माझं अद्याप मुलाशी बोलणं झालं नाही आणि माझी पत्नी खूप घाबरली आहे”, असं पवन कल्याण माध्यमांसमोर म्हणाले. मुलाबद्दलची माहिती मिळताच पवन कल्याण यांनी सिंगापूरला तातडीने रवाना होण्यासाठी अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मन्यम इथला त्यांचा कार्यक्रम रद्द केला. त्यांनी मार्क शंकरच्या प्रकृतीबद्दलची अपडेटदेखील दिली आहे.
“त्याची ब्रॉन्कोस्कोपी केली जाणार आहे. त्यासाठी त्याला भूल (ॲनास्थेशिया) दिली जाणार आहे. समस्या अशी आहे की श्वसनावाटे बराच धूर शरीरात गेल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम होईल”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. मोदींनी मुलाच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यासाठी पवन कल्याण यांना फोन केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला फोन करून सर्वकाही ठीक होईल असं समजावून सांगितल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी सिंगापूरमधील उच्चायुक्तालयाद्वारे मला खूप मदत केली. माझा मुलगा तिथल्या उन्हाळी शिबिरात सहभागी होणार होता आणि तिथेच आगीची घटना घडली. जेव्हा मला घटनेविषयी समजलं, तेव्हा मला ती सामान्य आग वाटली होती. नंतर मला त्याचं गांभीर्य समजलं. त्या आगीत एका मुलाने आपला जीव गमावलाय आणि इतर बरेच विद्यार्थी सध्या रुग्णालयात दाखल आहेत”, असं ते पुढे म्हणाले.
पवन कल्याण यांना रशियन पत्नी ॲना लेझनेवासोबत पोलेना अंजना पावानोवा आणि मार्क शंकर ही दोन मुलं आहेत. तर पूर्व पत्नी रेणू देसाई यांच्यासोबत त्यांना अकिरा नंदन आणि आध्या ही दोन मुलं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List