समीर वानखेडेंनी अभिनेत्री राखी सावंतवरचा मानहानीचा खटला मागे घेतला, काय आहे कारण?
केंद्रीय महसूल अधिकारी (IRS) समीर वानखेडे यांनी अभिनेत्री राखी सावंत आणि तिचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. यामध्ये वानखेडे यांनी 11.55 लाख रुपयांची नुकसान भरपाई, मानसिक त्रासाची भरपाईची मागणी केली होती. मात्र, आता दिंडोशी दिवाणी न्यायालयात दाखल केलेला हा खटला मागे घेतला आहे. समीर वानखेडे वैयक्तिक कारणांमुळे हे प्रकरण पुढे चालवू इच्छित नाहीत आणि म्हणूनच त्यांनी त्यांची तक्रार मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे झोनल डायरेक्टर म्हणून वानखेडे यांनी एका क्रूझवर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींना अटक करण्यात आली होती. देशमुख हे या प्रकरणातील आरोपी मुनमुन धामेचा यांचे प्रतिनिधित्व करतात. येथेच त्यांची ओळख झाली होती. याचसोबत राखी सावंत हिच्या काही कायदेशीर प्रकरणांमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
दरम्यान, हे प्रकरण सुरू असताना देशमुख यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये वानखेडेंविरूद्ध गंभीर आरोप केले होते. तसचे सोशल मीडिया अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या होत्या. तर राखी सावंत हिने देशमुख यांनी केलेल्या पोस्ट पुन्हा रिपोस्ट केल्या होत्या. त्यामुळे समीर वानखेडे यांनी या दोघांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
मात्र, आता वानखेडे यांनी हा खटला मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. यांच्या निर्णयावर न्यायालयाने त्यांना आणि देशमुख यांना न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहून त्यांच्यात एक सौहार्दपूर्ण तोडगा निघाला आहे हे सांगण्याचे निर्देश दिले होते.
तक्रार मागे घेतल्यावर या प्रकरणी राखी सावंतचे वकील देशमुख यांनी देखील प्रतिक्रिाया दिली. “आम्ही आमचे वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवले आहेत. आपापसात लढण्यापेक्षा खऱ्या लपलेल्या शत्रूंविरुद्ध लढत आहोत. याची प्रचिती मी राजकारणी नवाब मलिक यांची बहीण अॅडव्होकेट यास्मिन वानखेडे यांच्याविरुद्ध चालवत असलेल्या फौजदारी खटल्यात दिसून येते, असे ते यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List