पोलीस डायरी – महिलांच्या सुपाऱ्या वाढल्या !
>> प्रभाकर पवार
आई-वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिल्यानंतर मंडपातून किंवा लग्नाच्या आधी पळून जाणाऱ्या मुलींचे किस्से आपण अधूनमधून ऐकत असतो, परंतु आई-वडिलांनी ठरविलेल्या व आपणास न आवडणाऱ्या आपल्या भावी पतीचे हात-पाय तोडायची सुपारी देणाऱ्या एका तरुणीचा किस्सा ऐकल्यावर मती गुंग होते.
गेल्याच महिन्यात पुण्याच्या दौड गावच्या खामगाव फाट्याजवळ मोटरसायकलवरून आलेल्या पाच-सहा तरुणांनी सागर कदम या तरुणावर हल्ला केला. “मयुरीचा नाद सोड, नाहीतर तुला आम्ही ठार मारू” अशी धमकी देऊन सागरला चालता येणार नाही इतकी बेदम मारहाण केली. सागरला फॅक्चर करून आरोपी पळून गेले. सागरवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असता मयुरी दांगडे या तरुणीने आपणास न आवडणाऱ्या आपल्या भावी पतीवर हल्ला करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी मयुरीला अटक केली. मयुरीचे ज्या तरुणाबरोबर प्रेमाचे संबंध होते, तो तरुण मात्र मयुरीच्या या धाडसावर खूश झाला.
मयुरीने आपणास न आवडणाऱ्या सागरला लग्नापूर्वी धडा शिकविला. मग लग्न झाल्यावर तिने काय केले असते? त्याला ठार मारून त्याची घरातच समाधी बांधली असती. थोडक्यात, सागर केवळ नशिबाने वाचला. मुंबईच्या दहिसर (पूर्व), रावळपाडा येथे एका महिलेने आपल्या पतीला प्रियकराच्या मदतीने ठार मारून त्याची घरातच कबर खणली. काही महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आल्यावर त्या महिलेला व तिच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या प्रियकराला दहिसर पोलिसांनी अटक केली.
अनैतिक संबंध असल्याच्या केवळ संशयावरून पती आपल्या पत्नीला डोळ्यांसमोर खपवून घेत नाही. पती एकतर तिला घटस्फोट देतो किंवा माहेरी पाठवतो रागीट व क्रोधी पती असेल तर त्या महिलेचा तो स्वतःच काटा काढतो किंवा सुपारी देऊन तिची प्रियकरासह हत्या घडवून आणतो. परंतु आपले अनैतिक संबंध अबाधित ठेवण्यासाठी अलीकडे बऱ्याच महिला आपल्या पतीचा सुपारी देऊन काटा काढू लागल्या आहेत व हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे गुन्हेगारी तक्त्यावर नजर टाकली असता दिसून येते. गेल्या महिन्यात पुण्यातच अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढण्याच्या तीन घटना घडल्या. सागर कदमवर हल्ला झाला त्याच वेळी लोणी काळभोर येथील वडाळी परिसरात रवींद्र काळभोर याची त्याचीच पत्नी शोभा (42) आणि तिचा प्रियकर गोरख काळभोर (41) यांनी रवींद्र हा घराबाहेर झोपला असता दांडक्याने प्रहार करून हत्या केली. पुण्याच्या हडपसर येथे तर माधव टिकेटी (32) या आयटी इंजिनीअरने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध उघड झाल्याने आपल्या तीन वर्षांच्या चिमुरडीलाच गळा दाबून ठार मारले लफडे बायकोचे, परंतु या इंजिनीअरने आपल्या लहान मुलीलाच संपविले. अलीकडेच हैदराबादमधील रजिथा नावाच्या एका तिशीतील महिलेने आपल्या शाळेमधील जुन्या प्रियकराबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या 8 ते 10 वयोगटातील 3 मुलांचा खून केला, परंतु वर्गमित्राबरोबर लग्न करण्याची या सनकी महिलेची इच्छा काही पूर्ण झाली नाही. तिला जेलमध्ये जावे लागले. सेक्ससाठी, लैंगिक संबंधासाठी कोण कुठल्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही.
जग मुठीत आल्यावर, स्मार्ट फोनमधील ‘रील्स’ पाहिल्यावर महिलांमधील गुन्हेगारी वाढली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात त्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात उत्तेजित विवाहित मध्यमवयीन महिला अलीकडे आपल्यापेक्षा अर्ध्याअधिक वयाच्या अगदी अल्पवयीन मुलांशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुणे येथील फुरसंगी परिसरात राहणाऱ्या मोहिनी सतीश वाघ या 53 वर्षांच्या महिलेचे आपल्या शेजारी राहणाऱ्या अक्षय हरीष जावळकर या तिशीतील तरुणाशी गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मोहिनीच्या पतीला लागताच त्याने त्याला विरोध केला. मोहिनीला हे सहन झाले नाही. तिने आपल्या पतीच्या हत्येची (5 लाख रुपयांची) सुपारी देऊन त्याला ठार मारले बऱ्याच प्रौढ रोमांचित महिलांमध्ये अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणारी मुले आज सुरक्षित नाहीत. आंबटशौकीन शिक्षक मुली व मुलांवरही अत्याचार करतात. तक्रारीनंतर संबंधित शिक्षकांना अटकही होते, परंतु महिला शिक्षकही अल्पवयीन मुलांवर जेव्हा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आता विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न पडतो. परदेशात अल्पवयीन विद्याथ्यर्थ्यांचे महिला शिक्षक लैंगिक शोषण करतात अशा बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो, परंतु आता आपल्या देशातील शाळा-कॉलेजांमध्येही असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. पुण्यात अलीकडेच एका शिक्षिकेला खडक पोलिसांनी एका दहावीच्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केले या आरोपावरून ‘पोक्सों सारख्या कडक कायद्यान्वये अटक केली. सेक्ससाठी स्त्रीलंपट पुरुष कोणत्याही थराला जातो. परंतु महिलाही आपले अनैतिक संबंध अबाधित ठेवण्यासाठी क्रूरतेची जेव्हा सीमा गाठतात. तेव्हा मन बधिर होते. भविष्यात चारित्र्यवान माणसे सापडतील की नाही अशीही शंका निर्माण होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List