गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाली “लोक कुत्रे आहेत..”
अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सतत गेल्या काही दिवसांपासून आहेत. त्यांचा वकील ललित बिंदल याने स्पष्ट केलं होतं की सुनिताने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु त्यानंतर दोघांमधील मतभेद दूर झाले असून आता दोघं एकत्रच आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आणि ट्रोलिंगवर मोकळेपणे व्यक्त झाली. सुनिता तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. माध्यमांसमोर अनेकदा तिने स्पष्ट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा सुनिता तिच्या घटस्फोटाच्या चर्चांवर रोखठोक उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत थेट गोविंदाच्या तोंडून काही ऐकायला मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच मतं बनवू नका, असंही तिने म्हटलंय.
‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगवर सुनिता म्हणाली, “सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? सकारात्मक आहे मला माहीत आहे. मी विचार करते की लोक कुत्रे आहेत, ती भुंकणारच. जोपर्यंत तुम्ही माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून काही ऐकत नाही, तोपर्यंत तुम्ही याचा विचार करू नका की काय आहे आणि काय नाही.” त्याचप्रमाणे ट्रोलिंगचा स्वत:वर परिणाम होऊ देत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
सहा महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचा खुलासा तिच्या मॅनेजरने केला होता. इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही सुनिताने एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर सुनिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केलं की, “वेगवेगळे राहतो याचा अर्थ, जेव्हा गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा माझी मुलगी किशोरवयात होती. आमच्या घरात सतत पक्षाचे कार्यकर्ते ये-जा करायचे. घरात किशोरवयीन तरुणी शॉर्ट्समध्ये फिरत असेल तर ते बरं वाटत नाही. म्हणून घराच्या समोरच पक्षाच्या कामासाठी गोविंदाने ऑफिस घेतलं. अनेकदा कामामुळे आणि मिटींग्समुळे गोविंदाला रात्री खूप उशीर व्हायचा. मग तो तिथेच झोपायचा.” या व्हिडीओच्या शेवटी सुनिता असंही म्हणते, “मला आणि गोविंदाला कोणीच वेगळं करू शकत नाही. किसी का माई का लाल तो सामने आ जाए.”
गोविंदाने 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मात्र 2008 मध्ये त्याने राजकारणातून काढता पाय घेतला. गोविंदा संसदेत सतत गैरहजर असल्याने अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List