Sanjay Raut : कोणाचा बाप? ‘त्या’ उत्तरावर संजय राऊत यांची थेट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं, त्यावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. मोदींचे वारसदार कोण होणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नसतो, असं उत्तर दिलं होतं. मात्र फडणवीसांच्या या विधानानंतर आता संजय राऊत यांनी त्यावर म्हणणं मांडलंय. कोणाचा बाप ? अशी थेट प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
काय म्हणाले राऊत ?
वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर दिलं. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. उत्तराधिकारी ठरवणं हे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही, असं राऊत यांनी नमूद केलं. 2019 ला फडणवीस यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झाला. 2024 ला मोदी लोकसभेत बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. स्वतः नरेंद्र मोदी यांनी पक्षातील 75 वर्षाचा नियम केलाय. हा नियम लालकृषण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना लागू होता. येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षाचे होत आहेत, म्हणून त्यांना नियमाने निवृत्त व्हावं लागणार आहे असं राऊत म्हणाले.
तर फडणवीस नकली स्वयंसेवक
राम आणि कृष्ण देखील कार्य संपल्यावर निघून गेले. अडवाणी जिवंत असताना त्यांना शाहजान प्रमाणे कोंडून ठेवलं आणि मोदी पंतप्रधान झाले, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. आजचा भाजप 2 जगांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम अडवाणी यांच्यासारख्या नेत्याने केलं. अडवाणी यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना मोगली संस्कृती प्रमाणे कोंडून ठेवलं. RSS ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे उत्तराधिकाऱ्याबाबत आई-बाप पुढच्या गोष्टी ठरवतील. आरएसएसचे राजकारणात काय महत्व आहे हे फडणवीस यांना सांगायची गरज असेल तर ते नकली स्वयंसेवक आहेत, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
अध्यक्ष पदाची मुदत संपली असून हे आणखी अध्यक्ष नेमू शकले नाहीत. यात संघाची महत्वाची भूमिका आहे. पडद्याच्या मागे काहीतरी शिजत आहे, असा अंदाज राऊतांनी व्यक्त केला.
फडणवीस यांचं विधान काय होतं ?
नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राऊतांच्या या विधानावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचा नाही, तो होत नसतो. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही,नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत. आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List