छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना, राहुरीत कडकडीत बंद; तीव्र पडसाद!
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद राहुरी शहर आणि परिसरात उमटले. माथेफिरू आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत राहुरी शहर, देवळाली-प्रवरासह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
राहुरीतील बुवासिंदबाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर राहुरीत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. नगर-मनमाड महामार्गावर हजारो शिवप्रेमी जनतेने रास्ता रोको आंदोलन केले होते. आज शिवप्रेमी जनता आणि व्यापारी संघटनेने बंदची हाक दिली होती.
आठवडी बाजार असूनही सर्वत्र शुकशुकाट
राहुरी, देवळाली-प्रवरा, टाकळीमिया, वांभोरी, राहुरी फॅक्टरी, कणगर, बारगाव नांदूर, उंबरे, ब्राम्हणी, मानोरी, वळण, मांजरीसह बहुतांश गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गुरुवारी राहुरी शहरात आठवडी बाजार असतो. एरव्ही गर्दीने गजबजणाऱ्या बाजारात आज शुकशुकाट होता. व्यावसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. बंद शांततेत पार पडला. टाकळीमिया गावात शिवप्रेमी जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. आरोपीस तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने राहुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
कोल्हार येथे चक्का जाम आंदोलन
कोल्हार भगवतीपूर येथील शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनांनी आज नगर-मनमाड महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List