Kunal Kamra Controversy : मोठी बातमी ! कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक
एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली आहे. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 लोकांन तोडफोड केली होती. त्याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या 11 आरोपीना वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना सीआरपीसी 41 अंतर्गत नोटीस देण्यात आली.
संजय राऊत यांनीही कुणालचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, तो पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी काल रात्री द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. शिंदेंच्या शिवसैनिकांनी जे हॉटेल फोडलं, त्यात आता पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही. रात्रीच शो चे बॅनरही हटवण्यात आले. राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिंदेच्या शिवसैनिकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अखेर आज 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली – संजय निरुपम
दरम्यान कामराच्या या टीकेमुळे शिवसैनिक चांगलेच भडकले असून शिवसेना नेता संजय निरुपम यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कामराने जे केलं, ते व्यंग नाही, हा गंभीर आरोप आहे. तुम्ही आमच्या नेत्याला म्हणता गद्दार आहात. शिवसेनेत काय होतं हे माहीत आहे का ? गद्दारीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?, 2022मध्ये शिंदेच्या नेतृत्वात 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली, ती गद्दारी नव्हती शिवसेनेला करेक्ट डायरेक्शनला आणण्याचा तो प्रयत्न होता, असे निरुपम म्हणाले.
गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं. काँग्रेसशी युती केली. ते करेक्ट करण्यासाठी शिंदे यांनी बंडखोरी केली. संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचेच लोक शिंदेंना गद्दार म्हणतात. बाकी कोणी म्हणत नाही. कामराने सुपारी घेऊन हे सुरू केलं,असे आरोप संजय निरुपम यांनी केले.
कामरा हा संजय राऊतांचा माणूस
कुणाल कामरा कोण आहे. तो संजय राऊतचा खास माणूस आहे. संजय राऊत बरोबर कुणाल कामराचा फोटो आहे. त्यांचं काय घेणंदेणं आहे माहीत नाही. कुणाल कामरा काँग्रेसच्या इको सिस्टिमचा एक मेंबर होता. राहुल गांधी यांच्याबरोबर फिरतो. त्यांच्यासोबत राहतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवार सोबतही त्याचे फोटो आहेत,असा दावा निरुपम यांनी केला.
तर त्याचं तोंड काळ करू, मनिषा कायंदेही आक्रमक
शिवसेना आमदार मनिषा कायंदेंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणाल कामराने टिप्पणी केली नाही तर तो खालच्या स्तरावर जाऊन बोलला आहे. आम्ही देखील कुणाल कामरा यांच्या घरी जाऊन त्यांना शिवी देऊन आणि वरून संविधानच पुस्तक दाखवून फ्रिडम ऑफ स्पीच आहे असं म्हणू. ते चालेल का? असा सवाल कायंदे यांनी केला. आम्ही महिला शिवसैनिक आक्रमक होऊ आणि 2 दिवसात त्याने जर माफी मागितली नाही तर त्याचं तोंड आम्ही काळ करू असा इशारा कायंदे यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List