पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्वाचा निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा
Pune Traffic News: पुणे शहरातील वाहतुकीची समस्या हा मोठा गंभीर विषय आहे. पुण्यातील रस्ते आणि वाहनांची संख्या यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. विधानसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.
या उपाययोजना करणार
आमदार चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. त्यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी म्हटले की, ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला कायदा अधिक कडक केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींची लवकर सुटका होऊ नये, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल.
दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अधिक लक्ष
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.
राज्यमंत्री कदम म्हणाले, लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List