IPL 2025 – ठाकूरनेच छाटले गब्बरचे हात
गुरुवारी हैदराबादमध्ये लखनौ संघाचे वादळ घोंघावले. आयपीएलमध्ये सर्वच संघांच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या हैदराबादी ‘गब्बर’ फलंदाजांचे हात लखनौच्या ‘ठाकूर’ शार्दुलने आपल्या दुसऱयाच षटकात छाटले आणि त्याच कामगिरीच्या जोरावर ऋषभ पंतच्या लखनौने 17 व्या षटकातच आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या विजयाची पताका फडकावली.
शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौने हैदराबादला दोनशेच्या आतच रोखत सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर 191 धावांचा पाठलाग करणाऱया लखनौला मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात एडन मार्करमच्या रूपाने धक्का दिला, पण ही विकेट हैदराबादला फारशी मानवली नाही. कारण त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने अवघ्या 50 चेंडूंच्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकारांची बरसात करत 116 धावांची भागी रचत संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला. पूरनने 18 चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. तो वेगवान शतकाच्या दिशेने झेपावत असताना त्याचा झंझावात 26 चेंडूंत 70 धावा करून शांत झाला. त्याने या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकार लगावले. मग मार्शनेही 52 धावांची खेळी केली. दोघे बाद झाल्यावर आयुष बदोनी (6) आणि ऋषभ पंतही (15) बाद झाले, पण अब्दुल समदने 8 चेंडूंतच 22 धावा चोपत लखनौच्या पहिल्या विजयावर 23 चेंडू आधीच शिक्कामोर्तब केले.
इशानचा गोल्डन डक
हैदराबादसाठी पहिल्याच सामन्यात 47 चेंडूंत 106 धावांची घणाघाती खेळी करणारा इशान आज पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तो आपल्या आयपीएल कारकीर्दीत चक्क सहाव्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा दुर्दैवी विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. तसेच तो नवव्यांदा आयपीएलमध्ये शून्यावर बाद झालाय.
ठाकूरने रचला पाया
शार्दुल ठाकूरने सामन्याच्या तिसऱयाच षटकात हैदराबादचे घातक फलंदाज अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांची विकेट काढत त्यांच्या फलंदाजीचे हातच छाटले. या धक्क्यातून संघाला बाहेर काढण्यासाठी ट्रव्हिस हेडने जोरदार प्रयत्न केले. पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. त्याने 47 धावांची फटकेबाज खेळी केली. पुढे नितीशकुमार रेड्डी (32), हेन्रीक क्लासन (26) आणि अनिकेत वर्मा (36), पॅट कमिन्सने (18) संघाच्या धावसंख्येला वेग देण्यासाठी षटकारबाजी केली, पण नेहमीच अडीचशेचा टप्पा सहजपणे गाठणाऱया हैदराबादला लखनौने 190 धावांवर रोखले आणि इथेच अर्धी लढाई जिंकली. शार्दुलने आपला भेदक मारा कायम ठेवताना आपल्या शेवटच्या दोन षटकांतही अभिनव मनोहर आणि मोहम्मद शमी यांचे विकेट घेतले. त्यामुळे 34 धावांत 4 विकेट टिपण्याची शार्दुल ठाकूरची कामगिरी लखनौच्या विजयाची शिल्पकार ठरली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List