अवघ्या 5 महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतेय ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यापैकी काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, तर काही मालिकांचा प्रवास हा ठराविक महिन्यांपुरताच मर्यादित राहतो. अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेने पहिल्याच दिवशी दमदार टीआरपी मिळत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. मात्र आता अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेचं नाव आहे ‘उदे गं अंबे.. कथा साडेतीन शक्तीपिठांची’. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. साडेतीन शक्तिपीठांमधील ‘अ’कार पीठ म्हणजेच माहुरच्या रेणुका देवीचं महात्म्य प्रेक्षकांनी मालिकेच्या रुपात साक्षात अनुभवलं. उर्वरित शक्तिपीठांची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तोवर ‘उदे गं अंबे’ ही मालिका अल्पविराम घेणार आहे.
या मालिकेत आदिशक्ती आणि शिवशंकरांची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी मालिकेला दिलेल्या भरभरुन प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “प्रेक्षकांनी दिलेल्या मायेमुळेच आणि कौतुकामुळेच आम्ही कलाकार आजवर धडाडीने काम करत आलो. जी उदंड माया तुम्ही आमच्यावर केली तेवढंच निर्व्याज प्रेम तुमचं ‘उदे गं अंबे’वरही होतं. आज आम्ही ही श्री रेणुका महात्म्याची पुष्पांजली देवी आईच्या चरणी ठेवत आहोत. जी काही कलारुपी सेवा आमच्या हातून घडली ती सगळी देवी चरणी आणि तुम्हा मायबाप रसिकांचरणी सादर समर्पित,” असं ते म्हणाले.
“स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची संधी आम्हाला दिली. त्याचप्रमाणे तुम्हा रसिक प्रेक्षकांचेही ऋणी आहोत, ज्यांनी आम्हाला आपल्या हृदयात स्थान दिलं. आता नव्या शक्तिपीठाची गोष्ट घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येऊ. पण तूर्तास निरोप घेतो. हा निरोप पूर्णविरामाचा नाहीये, हा अल्पविराम आहे. कारण आईची गाथा आभाळाएवढी आहे; ती अशी शे पाचशे – हजार भागांमध्ये सांगून संपणारी नाहीये. तेव्हा हा स्नेहबंध आणि माया अशीच जागती ठेवा.. आपल्या मनामनात आणि घराघरात आईचा उदोकार गर्जू दे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही मालिका गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पहिल्याच दिवशी 4.5 टीव्हीआर मिळवत ही मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात संध्याकाळी 6.30 वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी एकमेव मालिका ठरली होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List