संगमेश्वरमधील ‘छावा’च्या शूटिंगचे ते क्षण; दाटून आला दिग्दर्शकाचा कंठ, विकीने मारली मिठी
‘हा चित्रपट नाही तर भावना आहे’, ‘तुम्ही इतिहास जिवंत केला’, ‘तुमची मेहनत यशस्वी ठरली’.. अशा असंख्य प्रतिक्रिया अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ या चित्रपटाबद्दल ऐकायला, वाचायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘छावा’च्या प्रदर्शनाला चार आठवडे उलटले असूनही थिएटरमध्ये अजून त्याचीच गर्जना ऐकायला मिळतेय. हेच या चित्रपटाचं मोठं यश मानलं जातंय. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्याप्रकारे उतेकरांनी मोठ्या पडद्यावर मांडला, तो पाहून केवळ देशभरातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांचे डोळे पाणावले आहेत. अशातच विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. संगमेश्वरमध्ये ज्याप्रकारे क्लायमॅक्स शूट करण्यात आला, त्याच्या पडद्यामागची दृश्ये या व्हिडीओत पहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या अखेरीस दिग्दर्शक उतेकरांचे डोळे पाणावतात.
‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर छत्रपची संभाजी महाराजांचा संघर्ष आणि त्यानंतर त्यांचा झालेला अतोनात छळ पडद्यावर कसा साकारला, हे या व्हिडीओत पहायला मिळतंय. क्लायमॅक्सच्या सीनची तयारी कशा पद्धतीने झाली, विकीचा मेकअप कसा झाला, अक्षय खन्नाने क्रूर औरंगजेब कसा साकारला, या सर्वांची झलक या व्हिडीओत पहायला मिळते. या व्हिडीओच्या अखेरीस जेव्हा उतेकर आणि विकी कौशल प्रतिक्रियेसाठी उभे राहतात, तेव्हा दिग्दर्शकांचा कंठ दाटून येतो. “राजे सीरिअसली थँक्यू, ‘छावा’ची जशी कल्पना होती ती..” असं म्हणताना त्यांचा कंठ दाटून येतो तेव्हा बाजूला उभा असलेला विकी त्यांना मिठी मारतो.
विकीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘विकी कौशल आणि लक्ष्मण उत्तेकर सर तुम्हा दोघांनाही हा महाराष्ट्र विसरणार नाही. तुम्ही इतिहास जिवंत केला,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘अखेरीस दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशलने ज्याप्रकारे मिठी मारली, त्यावरून हा ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी कसा पूर्ण केला हे दिसून येतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘दिग्दर्शक भावूक झाले, यातूनच सर्वकाही दिसून येतंय,’ असंही एका युजरने लिहिलं आहे. हा चित्रपट नव्हे तर ही एक भावना आहे.. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List