चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न, आता घटस्फोटाची मागणी; पतीकडून धक्कादायक आरोप
‘रब से है दुआ’, ‘ये जादू है जिन का’ आणि ‘अपोलेना’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती शर्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनीत कौशिकने असा दावा केला आहे की अदितीने आधी त्याच्याशी गुपचूप लग्न केलं आणि आता लग्नाच्या चार महिन्यांतच ती त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी करतेय. इतकंच नव्हे तर अभिनीतने अदितीवर विवाहबाह्य संबंधाचाही आरोप केला आहे. सहकलाकारासोबत तिचं अफेअर असल्याचा दावा त्याने केला आहे. ‘इंडिया फोरम’शी बोलताना अभिनीत कौशिकने सांगितलं की अदिती शर्माने लग्नाबद्दल गुप्तता पाळण्याची विनंती त्याच्याकडे केली होती.
याविषयी अभिनीत म्हणाला, “आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि लिव्ह-इनमध्ये राहत होतो. तिच्या जवळच्या सर्व लोकांना, सहकलाकारांना, कुटुंबीयांना आमच्याबद्दल माहीत होतं. मी तिचा मॅनेजर असल्याचा दिखावा करायचो. खरंतर मॅनेजर म्हणून मी तिचं सर्व कामसुद्धा पाहायचो. तिचे मिटींग्स, तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट, कोलॅबरेशन हे सर्वकाही मीच पाहायचो. आम्ही गेल्या वर्षापासून एकत्र राहू लागलो होतो आणि नोव्हेंबर महिन्यात लग्नसुद्धा केलं.”
“गेल्या दीड वर्षापासून ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. परंतु मी लग्नासाठी अद्याप तयार नसल्याचं तिला म्हणायचो. खरंतर रिलेशनशिपच्या सुरुवातीला मीच लग्नासाठी खूप उत्सुक होतो. पण नंतर कुटुंबात काही गोष्टी घडल्यानंतर मी लग्नाबाबत थोडा आणखी विचार करू लागलो. मी लग्नासाठी तयार नव्हतो. पण ती माझ्या मागेच लागली होती. दीड वर्षापर्यंत तिने माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला आणि अखेर मी तयार झालो. आम्ही नोव्हेंबर 2024 मध्ये लग्न केलं. तिची एक अट होती की करिअरच्या कारणास्तव या लग्नाबद्दल आम्ही बाहेर कोणाला काहीच सांगू नये”, असं तो पुढे म्हणाला.
अदिती शर्माचा पती असल्याचा दावा करणाऱ्या कौशिकने याविषयी सांगितलं, “लग्न ही एक कमिटमेंट होती आणि तुम्हाला माहीत आहे की एक पार्टनर म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सर्वकाही करता. तुम्ही जोडीदाराच्या करिअरमध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करता. म्हणूनच ती जे काही म्हणाली, ते मी ऐकत गेलो. आम्ही आमच्या घरात तिच्या भावा-बहिणींसमोर आणि आमच्या आईवडिलांसमोर लग्न केलं. दोन पंडितांनी संपूर्ण विधीनुसार लग्नाची विधी पार पाडली. माझ्याकडे आमच्या लग्नाचे हजारो फोटो आहेत.”
अभिनीतने अदितीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचेही आरोप केले आहेत. ‘अपोलेना’ या मालिकेतील सहकलाकार सामर्थ्य गुप्तासोबत अदितीचं अफेअर असल्याचा दावा त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर अदितीला रंगेहात पकडल्यानंतर तिने त्यांच्या लग्नाला ‘मॉक ट्रायल’ आणि ‘अवैध’ असल्याचं म्हटलं. त्याचसोबत घटस्फोटाची मागणी करत 25 लाख रुपयांची पोटगीसुद्धा मागितली. अभिनीतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अदिती शर्मासोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘भेटा माझी पत्नी अदिती शर्माला..’. अभिनीतच्या या आरोपांवर अद्याप अदितीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List