Women’s Day 2025- बॉलिवूडमध्ये ढिशूम… ढिशूम… करणारी तिच आहे ऐश्वर्या, अनुष्का, आलिया; बाॅडी डबल करणाऱ्या सनोबर पारदीवालाचं विशेष फिचर
>> प्रभा कुडके
स्टंटच्या दुनियेतील एक वलयांकित नाव म्हणजे सनोबर पारदीवाला. सनोबर पारदीवाला या नावाला स्टंट इंडस्ट्रीत खूप महत्त्व आहे. या नावाचं वजन इंडस्ट्रीत खूप असल्याने सनोबर मागेल ती किंमत स्टंटसाठी तिला मिळते. सनोबरचं इंडस्ट्रीतलं वजन किती आहे याचं एकमेव उदाहरण द्यायचं झाल्यास अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाची पत्रिका सनोबरला आली होती यावरून आपण हिचा या क्षेत्रातील वजनाचा अंदाज लावू शकाल. आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सनोबरने स्टंट केले असून, ती सतत म्हणते स्टंट मेक मी अलाईव्ह…
सनोबरचे अवघ्या 12 व्या वर्षी स्टंट इंडस्ट्रीमध्ये आगमन झालं होतं. 12 वर्षांची असताना सनोबरला एक जाहिरात करण्याची संधी मिळाली. नक्षत्रच्या जाहिरातीमध्ये तिला ऐश्वर्या रायसाठी बाॅडी डबल म्हणून काम करायचं होतं. यात ती स्टंट आर्टिस्ट म्हणून काम करणार होती. त्या वेळी तिच्यासमोर केवळ एकच उद्दिष्ट होतं की जे सांगितलंय ते करायचं आहे.
आज तब्बल 18 वर्षांनंतरही सनोबरचं तेच उद्दीष्ट आहे की जे सांगितलंय ते मेहनत करून नीट पार पाडायचं. सध्याच्या घडीला सनोबरची इंडस्ट्रीतली ओळख म्हणजे ऐश्वर्यासाठी डुप्लीकेट स्टंट करणारी म्हणून आहे. ऐश्वर्याचा कुठलाही चित्रपट असो त्यात सर्व तिचे स्टंटस् सनोबर लीलया पार पाडते. घरात या क्षेत्रातील कुणी नसताना सनोबरचा या क्षेत्रातील प्रवासही अगदी चमत्कारीक आहे.
सनोबर पारदीवाला म्हणजेच पारसी घरातील एक टिपिकल पारसी मुलगी. अवघ्या 12 वर्षांची असताना तिचा बॉयफ्रेंड होता. त्याच्यामुळेच तिचा या क्षेत्रात प्रवेश झाला. तिच्या या अशाप्रकारे वागण्याला आईने अक्षरश वेड्यात काढलं होतं. पण काही काळानंतर तिच्या आईचं मत या प्रोफेशनबद्दल प्रचंड बदललं हेही तितकच खरं.
लहान असल्यापासूनच जिमनॅस्टिक आणि कराटे या दोन्हींची तिला आवड होती. यामागेही एक किस्सा आहे. शाळेत असताना कथ्थक की कराटे यामधून एकाची निवड करण्याची वेळ आल्यावर सनोबरने कथ्थकची निवड केली होती. पण अवघ्या आठ दिवसातच ती या कथ्थकला कंटाळून कराटे शिकण्यासाठी गेली. तिथपासून सनोबरचा प्रवास स्टंटच्या दिशेने सुरू झाला. असाच एक दुसरा किस्सा म्हणजे सनोबरला शाळेची सुट्टी पडली, आईने त्या वेळी तिच्यासमोर दोन पर्याय ठेवले. ते म्हणजे, एका नातेवाईकांकडे सुट्टीत राहायला जायचं किंवा स्विमिंग करायचं. नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा सनोबरने स्विमिंगला अधिक पसंती दिली. यावर बोलताना सनोबर म्हणते, त्यावेळी मी जेजे निर्णय घेतले ते सर्व योग्य होते.
रावण, जब तक है जान या चित्रपटातील सर्व स्टंटस् तिनेच केले आहेत. कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, करिना कपूर, अनुष्का शर्मा, आलिया भट या अशा अनेक नामांकित अभिनेत्रींसाठी तिने बाॅडी डबल म्हणून काम केलेलं आहे. व्यवसायाने फिजिओलॉजिस्ट, हिप्नोथेरपिस्ट, न्यूट्रीशिनिस्ट असणाऱ्या सनोबरला स्टंट या तिच्या क्षेत्रासंदर्भात अधिक विचारलं असता ती म्हणते, मी जिवंत आहे ही भावना मला स्टंट देतं. काहीतरी चॅलेंजिंग काम मिळणं म्हणजे माझ्यासाठी रिफ्रेशमेंट आहे असं मत तिने व्यक्त केलं.
आजच्या घडीला अंडरवॉटर स्विमिंगमध्ये स्टंट करणाऱ्या मुली अगदी हाताच्या बोटावर आहेत त्यातलीच एक मी आहे असं ती म्हणते. स्विमिंग माझ्यासाठी उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. तिच्या मते पाण्यात असताना ती एखाद्या मासोळीसारखीच असते. सेटवर सनोबर जेव्हा तिच्या याम्हा बाइकवर किंवा कारमधून जाते तेव्हा पाहणाऱ्यांच्या नजरा लगेच बदलतात. इतक्या लहान वयात या मुलीने खूप काही कमवलं असं आपसूक सर्वाच्या तोंडी येतं. या क्षेत्रातील व्यक्तींच्या संदर्भात बोलताना ती म्हणते, मी प्रत्येकासोबत काम करत नाही. मला ज्या अॅक्शन दिग्दर्शकासोबत काम करायचंय त्याच्याबरोबरच मी काम करते. या क्षेत्रात मुलींना रिसपेक्ट फार कमी मिळतो का? यावर ती म्हणते, खूप कमी. मुली म्हणजे, अरे यार ए तो जल्दी पट जाएगी याच दृष्टिकोनातून पाहिले जाते.
सनोबरचं वय लहान असल्यामुळे तिला प्रशंसा तर मिळतेच पण त्याही बरोबरीने अपमानालाही तोंड द्यावं लागतं. एकदा असाच एक प्रसंग घडला. सनोबरला बाइक स्टंट करायचा होता. पण तिच्यामते त्या अॅक्शन डिरेक्टरने जो काही सेट उभा केला तो योग्य नव्हता. याबाबत तिने त्या अॅक्शन डिरेक्टरलाही सांगितलं. ती त्यांना जाऊन म्हणाली, हा बाइक स्टंट करताना कुणाला तरी लागणार. ही बाइक व्यवस्थित लॅन्ड होणार नाही. त्यावर तो डिरेक्टर म्हणाले, तुला फक्त काम करायचं आहे, अधिक काही बोलण्याची गरज नाही. तुझा पाय तुटला तरी मला काही फरक पडणार नाही. असं त्यांनी म्हटल्यावर तिने तो स्टंट करण्यास नकार दिला. तिने नकार दिल्यावर तिची खोड जिरवायची म्हणून त्या दिग्दर्शकाने तिथे असलेल्या एका स्टंटमॅनला विग लावला आणि तो स्टंट करायला सांगितला. त्याने चरस ओढून तो स्टंट करायला गेला. त्याने तो स्टंट तर नीट केला नाहीच. शिवाय त्याचा या अपघातात पाय मोडला अणि तिथे उपस्थित असलेल्यांच्या अंगावरही ती बाइक त्याने घातली. त्यावेळी या घडलेल्या प्रकारानंतर ते अॅक्शन डिरेक्टर तिच्याकडे पाहातच राहिले. चांगल्या वाईट अशा अनेक अनुभवांनी सनोबर आज समृद्ध झालेली आहे. मुख्य म्हणजे तिला माणसं ओळखता येऊ लागली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List