‘तारक मेहता..’मधील अय्यर खऱ्या आयुष्यात आजही सिंगल; लग्नाबद्दल म्हणाला..
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मालिका आणि त्यातील कलाकार खूप आवडतात. जवळपास गेल्या 15-16 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. इतक्या वर्षात या मालिकेतील काही कलाकार बदलले. तरीही आजसुद्धा या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही. या मालिकेत बबिताचा नवरा मिस्टर अय्यरची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्देनं त्याच्या खऱ्या आयुष्याविषयी खुलासा केला आहे. “मी खऱ्या आयुष्यात पोपटलाल आहे”, असं तनुजने म्हटलंय. ‘तारक मेहता..’ या मालिकेत पोपटलालचं लग्न होत नाही. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात तनुजचंही लग्न जुळत नाहीये. त्यामुळे त्याने स्वत:ला पोपटलाल असं म्हटलंय.
44 वर्षीय तनुज अजून अविवाहित आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मालिकेत माझी खूप सुंदर पत्नी आहे. पण खऱ्या आयुष्यात मी अजूनही सिंगलच आहे. मी खऱ्या आयुष्यात पोपटलाल आहे. अद्याप माझं लग्न कुठे जुळलं नाही. पण आता या विषयावर बोलत असतानाच मला आशा आहे की माझ्या आयुष्यात लवकरच काहीतरी सकारात्मक घडेल.” मालिकेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खऱ्या आयुष्याकडे फारसं लक्ष देऊ शकले नाही का, असा प्रश्न त्याला पुढे विचारण्यात आला. त्यावर तनुजने सांगितलं, “कदाचित.. मला त्याचं कारण माहीत नाही.”
या मुलाखतीत तनुजने अभिनेते दिलीप जोशी यांच्यासोबत काम करतानाचा अनुभवसुद्धा सांगितला. या मालिकेत दिलीप जोशी हे जेठालालची भूमिका साकारत आहेत. जेठालाल आणि मिस्टर अय्यर यांच्यात नेहमीच मजेशीर भांडणं पहायला मिळतात. कारण जेठालालला अय्यरची पत्नी बबिता खूप आवडते. याविषयी तनुज म्हणाला, “या मालिकेच्या सुरुवातीला मला दाक्षिणात्य भूमिका साकारणं खूप कठीण होतं. सुरुवातीला मी खूप जलद बोलायचो. पण त्यात दिलीप जोशी यांनी माझी खूप मदत केली. निर्माते असितकुमार मोदी यांनीसुद्धा माझी मदत केली.” ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यात काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List