थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सुनावले, अजितदादांना केले हे आवाहन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर आल्याने समाज हेलावले आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध नेत्यांनी त्यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी महायुती सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. गृहखात्यासह सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना हा सर्व प्रकार माहिती असताना सुद्धा आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याने संतापाचा भडका उडाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जी चालढकल करण्यात आली, त्यावर आता सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकरणावर आता तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
रोहित पवारांची जळजळीत प्रतिक्रिया
बीडमधील गुंडांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लघवी केल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली. खरंतर हा रिपोर्ट, हे फोटो काल आपल्याकडे आलेत. पण दोन महिन्यांपूर्वीच हे फोटो, व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे सुद्धा आले असावेत. दोन महिन्यांपूर्वी महायुतीमधील वरिष्ठांना माहिती असताना सुद्धा त्यांनी धाडसी निर्णय घेतला नाही. तुमच्याकडे मन आहे का? असा प्रश्न लोकांना पडल्याचे रोहित पवार म्हणाले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली की, तुमची जी काय मैत्री असेल, संबंध असतील ते कचऱ्यात टाका. पण आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. वाल्मिक कराड हा राक्षसी माणूस आहे, तो मुंडेंचा अगदी खास आहे, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. दोन महिन्यांपासून हे फोटो सरकारकडे असताना ही ज्या पद्धतीने सरकार वागत आहे, त्यावरून तुम्ही आरोपींची आणि धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहात, असे आमचे मत असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केला.
एक नागरिक म्हणून एक पुतण्या म्हणून सांगतो, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, असे आवाहन रोहित पवार यांनी अजितदादांना केले. निर्णय घेण्याची धमक दादांमध्ये आहे. त्यामुळे दादांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे.
थोरले मुंडे जर आज असते, तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकाने मारले असते, अशी तीव्र प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. पंकजाताई यांना सुद्धा त्यांनी याप्रकरणी समोर येण्याचे आवाहन केले. आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे विरोधकांचे मत असल्याचे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List