‘छावा’च्या शूटिंगदरम्यान विकी-अक्षय एकमेकांशी बोललेच नाही; कारण वाचून व्हाल थक्क!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्ना हा मुघल शासक औरंगजेबच्या भूमिकेत आहे. टीझर आणि ट्रेलरमधील अक्षय खन्नाच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यापूर्वी कधीच न दिसलेल्या अंदाजात अक्षय प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेसाठी त्याच्या निवडीने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे त्यांच्या चित्रपटातील भूमिकांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.
“ज्याप्रकारे अक्षयने औरंगजेबाची भूमिका साकारली, ते पाहून तुम्ही अक्षरश: भयभीत व्हाल. तो मितभाषी आहे पण त्याच्या डोळ्यांनीच तो संवाद साधतो”, असं उतेकर ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. अक्षयने त्याच्या करिअरमध्ये फार मोजक्या भूमिका स्विकारल्या आहेत. औरंगजेबाच्या भूमिकेसाठी तो कसा तयार झाला, असा प्रश्न विचारल्यावर उतेकर म्हणाले, “त्यासाठी आम्हाला फक्त त्याच्या अलिबागच्या घरी जावं लागलं होतं. अक्षय माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याने कमी प्रोजेक्ट्स केले असले तरी त्या त्याने मनापासून काम केलंय.”
अक्षयसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, याविषयी विकीने सांगितलं, “छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाला नऊ वर्षे लागली होती. त्यामुळे त्याने शोध कसा घेतला, याविषयी चित्रपटात बरंच काही दाखवलंय. आमचे काही सीन्स सोबत आहेत, पण हा चित्रपट या दोघांचा एकमेकांच्या भेटीसाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचा आहे. ते दोघं एकमेकांसमोर कधी येतील, याची तुम्ही प्रतीक्षा कराल. एकीकडे औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेत त्याने आणलेला धूर्तपणा आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांची गर्जना यांचा सुंदर मिलाप या चित्रपटात पहायला मिळेल.”
विशेष म्हणजे दोघांमधील संघर्षाचा मोठा सीन शूट करण्यापूर्वी विकी आणि अक्षय यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. याविषयी उतेकर म्हणाले, “ज्यादिवशी त्या दोघांचा सीन शूट होणार होता, त्याचदिवशी ते सेटवर पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेसुद्धा त्यांच्या भूमिकेतूनच.” शूटिंगच्या आधी त्यांनी एकमेकांशी कोणताच संवाद साधला नव्हता, असं विकीने स्पष्ट केलं. “आम्ही जेव्हा तो सीन शूट करत होतो, तेव्हा एकमेकांना हाय-हॅलो, गुड मॉर्निंग असं काहीच बोललो नाही, तो औरंगजेब होता आणि मी छत्रपती संभाजी महाराज होतो. आम्ही थेट शूटिंगसाठी गेलो होतो. विकी कौशल आणि अक्षय खन्ना म्हणून आमच्यात काहीच संवाद झाला नव्हता”, असं त्याने पुढे सांगितलं.
यामागचं कारण विकी कौशलने उलगडून सांगितलं. तो म्हणाला, “ज्या पद्धतीचे आम्हा दोघांचे सीन्स होते, ते पाहून आम्ही बाजूबाजूला खुर्चीवर बसून चहा-कॉफी पिऊन मग शूटिंगसाठी जाऊ शकत नाही. आम्हा दोघांकडून हे सहजरित्या झालंसुद्धा नव्हतं. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही.” इतकंच नव्हे तर विकी आणि अक्षय हे त्यांच्या भूमिकांमध्ये इतके मग्न झाले होते, की त्यांना एकमेकांचा चेहरासुद्धा पहायचा नव्हता, असं दिग्दर्शक उतेकरांनी सांगितलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List