विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश
‘संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. वॉर्ड आरक्षणाचा निकाल लागेल. एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेने आपापली जबाबदारी घ्या. विधानसभा निवडणुकीसारखी चूक आता नको, महापालिकेसाठी सज्ज व्हा,’ असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिले. मतदान नोंदणी तपासा, सदस्य नोंदणी करा, अशा सूचनाही त्यांनी शिवसैनिकांना दिल्या. विभाग क्रमांक 6 च्या (कुर्ला, कालिना, चांदिवली विधानसभा) विभागप्रमुखपदी सोमनाथ सांगळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांना संबोधित केले.
असा धक्का देऊ की ते पुन्हा उठणारच नाहीत
उद्धव ठाकरे यांनी सद्य स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या माझी जपानसारखी स्थिती झाली आहे. जपानमध्ये एखाद्या दिवशी भूपंपाचा धक्का बसला नाही तर लोकं आश्चर्य व्यक्त करतात. तसंच उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के असे वारंवार दाखवले जातेय. त्यामुळे मी आता धक्कापुरुष झालोय, असे मिश्कील वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोण किती धक्के देतात ते बघूयाच, त्यांना द्यायचा तेव्हा असा धक्का देऊ की पुन्हा उठणारच नाहीत, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी देताच शिवसेनेच्या जयघोषाने ‘मातोश्री’चा परिसर दुमदुमला.
कुणालाही आता रुसू देऊ नका
एखादा निर्णय घेतला की, थोडीशी राजी-नाराजी असते, पण कोणालाही आता रुसायला देऊ नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले. ‘मुळावर घाव घालणारे सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा करून त्याची कुऱहाड बनवून शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण एक राहिलो नाही तर त्यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ही लढाई एकट्याची नाही, सर्वांची आहे
सोमनाथ सांगळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेले जुने शिवसैनिक आहेत. ते थोडे कडव्या शिस्तीचे आहेत, पण सैनिक म्हटल्यावर शिस्त असावीच लागते. थोडेसे काही रुसवेफुगवे असतील, पण ही लढाई एकटय़ादुकटय़ाची नाही, आपली सर्वांची आहे, असे सांगतानाच, सांगळे विभागप्रमुख असलेले तीनही वॉर्ड महापालिका निवडणुकीत भगवे होतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘छावा’ आवर्जून बघा… पण रडत नको, डोळे उघडून बाहेर पडा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ चित्रपट आवर्जून पहा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले. ‘छावा’ पाहिल्यानंतर लोकं डोळे पुसत थिएटरबाहेर पडताहेत असा रिपोर्ट आहे, पण हा चित्रपट पाहून डोळे पुसत बाहेर पडू नका तर डोळे उघडे ठेवून चित्रपट पहा, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List