वड्यापेक्षा पाव गरम…

वड्यापेक्षा पाव गरम…

>> प्रभा कुडके

मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणकारी बेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे आता बेकरीधारकांना महागडय़ा इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील भट्टय़ांचा वापर करावा लागणार आहे. यामुळे पावाचा उत्पादन खर्च वाढल्याने पावाची किंमतही वाढणार असून वड्यापेक्षा पावच ‘गरम’ असल्याची स्थिती निर्माण होणार आहे. शिवाय महागडय़ा वडापावपेक्षा फक्त वडाच खाण्याकडे खवय्यांचा कल वाढणार आहे. शिवाय पावाने भाव खाल्ल्याने आता मिसळपाव, उसळपाव, भाजीपावसह अनेक पदार्थांची किंमत वाढणार आहे.

मुंबईचा गरमागरम वडापाव म्हणजे गोरगरीबांसह श्रीमंतांचीही पहिली पसंत आहे. अनेक गोरगरीब केवळ वडापाव खाऊनच दिवस ढकलत असतात. शिवाय चहा आणि पावाची दोस्तीही खास आहे. त्यामुळे ‘मुंबईच्या वडापावा’ची जगभरात ख्याती आहे. यामध्ये पावाची इतकी ख्याती आहे की, मिसळपाव, पावभाजीचा आस्वाद घेताना एक्स्ट्रा पावांवर ताव मारला जातो. मात्र लवकरच पावाची मागणी आता रोडावण्याची शक्यता आहे. याला कारणही तसंच आहे. कारण राज्याच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता पालिकेने प्रदूषणकारी भट्टय़ा बंद करून पर्यावरणपूरक भट्टय़ा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र बेकरी व्यावसायिक नोटिसांमुळे अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम पावाच्या पुरवठ्यावर होणार असून नवीन नियमांमुळे बेकरी प्रोडक्ट असलेला पाव महागणार असल्याचे बोलले जात आहे.

फेरविचारासाठी आता सरकारकडे धाव

मुंबईसारख्या शहरात कित्येक बेकऱया या 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. शिवाय प्रत्येक बेकरीच्या दारात गॅस पाइपलाइन किंवा इतर सुविधा पोहोचणे हे अतिशय कठीण आहे. म्हणून बेकर्स असोसिएशनने त्यांना येणाऱया अडचणींचे एक पत्र आता सरकारला दिल्याची माहिती बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष खोदादाद इराणी यांनी दिली.

मुंबईकरांच्या जिव्हाळय़ाचा पाव बंद होणे ही मुश्कील गोष्ट आहे, परंतु न्यायालयाने सांगितलेल्या चौकटीत मात्र काम करणे हे आता क्रमप्राप्त असणार आहे. येत्या काही दिवसांत वीज आणि गॅसवर तयार झालेला पाव आपल्या घरात आल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. – विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ

व्यवसाय सुरू ठेवायचा की बंद करायचा?

यासंदर्भात बोलताना देवनार येथील बेकरी मालक अविनाश शेंडे म्हणाले की, पूर्ण सेटअप बदलणे हे आमच्यासाठी खूप त्रासदायक असणार आहे. हा बेकरी व्यवसाय सुरू ठेवायचा की नाही, असाच प्रश्न आता आमच्यासमोर उभा राहिला आहे. आमची बेकरी गावठाणात असल्यामुळे या ठिकाणी गॅस पाइपलाइन येणे हे जिकिरीचे आहे. मग आम्ही हा व्यवसाय तरी पुढे कसा सुरू ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री