विशेष – स्वातंत्र्याचा अर्थ
>> ऋता बावडेकर
स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवे तसे वागता, बोलता येणे. मात्र व्याख्येइतका या शब्दाचा अर्थ सोपा नाही. या स्वातंत्र्याबरोबर ‘जबाबदारीची जाणीव’ असणे फार महत्त्वाचे असते. स्वातंत्र्याच्या नावाखाली उच्छृंखल वागणे केव्हाही सोपे. पण जेव्हा ‘तथाकथित स्वतंत्र’ वागण्याची व कारणे देण्याची वेळ येते आणि जबाबदारी घेण्याची वेळ येते, तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि किंमत कळते.
आपल्याला हवे तसे वागता येणे, हवे तसे वावरता येणे, बोलता येणे, हवे तिथे जाता येणे वगैरे वगैरे म्हणजे स्वातंत्र्य. अगदी साधी, सरळ, सोपी व्याख्या, पण अशी व्याख्या करणे जेवढे सोपे, तेवढे स्वातंत्र्य मिरवणे, त्याचा लाभ घेणे, ते उपभोगणे सोपे आहे का?
मुळात स्वातंत्र्याची अशी एकच एक व्याख्या करता येत नाही. हा केवळ एक शब्द नाही, तर ही एक संकल्पना आहे. तिला अनेक आयाम आहेत. अनेक बाजू आहेत. यात शब्दाच्या अर्थाबरोबरच जशी हक्काची व अधिकाराची भावना आहे, तशीच जबाबदारीची जाणीवही आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्याची मागणी करतो व त्याविषयी बोलतो, तेव्हा हक्क आणि अधिकाराबरोबरच जबाबदारीची जाणीव असणे अतिशय आवश्यक ठरते. अन्यथा सोशल मीडियामुळे सध्या जी परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे, झाली आहे तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जागतिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट वगैरेंमुळे जग खूप जवळ आले. माध्यमक्रांतीमुळे तर हे जग मोबाइलद्वारे आपल्या हातातच येऊन बसले. जगभराची माहिती एका क्लिकद्वारे मिळू लागली. आपली माहिती जगभरात पोहोचू लागली. कोणत्याही विषयावर आपल्याला आपली मते मांडता येऊ लागली. त्यासाठी फेसबुक, एक्स (आधीचे ट्विटर), इन्स्टाग्राम वगैरे समाजमाध्यमे आपल्यापुढे हात जोडून उभी राहू लागली. आमच्या ऑफिसमधल्या एका सहकाऱयाला “काय लिहिताय?’’ विचारले की ते म्हणत, “निक्सनला उपदेश करतोय.’’ आतापर्यंत अग्रलेखापुरती मर्यादित असलेली ही गोष्ट समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य माणसालाही (यात स्त्राr, पुरुष दोघेही आहेत) शक्य होऊ लागली. त्यासाठी तो ट्विट करू लागला, कमेंट्स करू लागला, पोस्ट्सही लिहू लागला. आता तो वर्तमानपत्रांच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरावर अवलंबून नव्हता. त्याचा तो ‘स्वतंत्र’पणे आपली मते मांडू लागला. त्यावर चर्चा घडवून आणू लागला. भले ते वर्तुळ छोटे असेल, पण त्याला व्यासपीठ मिळाले. ही गोष्ट चांगलीच आहे. मात्र आपण जी मते धाडसाने मांडतो त्याची जबाबदारी घ्यायला ही मंडळी तयार असतात का, हा इथे कळीचा मुद्दा आहे. कारण दिसणाऱया नावावरून एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यायला गेले की, अनेकदा ते अकाऊंट बनावट असल्याचे लक्षात येते. अर्थात हा शोधही तंत्रज्ञानामुळेच शक्य झाला आहे.
याला ‘स्वतंत्र’ किंवा ‘स्वातंत्र्य’ म्हणत नाहीत. हा पळपुटेपणा झाला. म्हणूनच स्वातंत्र्याचा अर्थ जितका साधा, सरळ, सोपा वाटतो, तितका तो नाही. मात्र तो फार गुंतागुंतीचाही नाही. फक्त त्याच्याबरोबर येणाऱया हक्क, अधिकार या बाजूंबरोबर ‘जबाबदारी’ हा जो आयाम येतो, तो तितकाच किंबहुना आधीच्या शब्दांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे हे समजून घ्यायला हवे. ‘मला हवे ते मी बोलणार’, ‘मला हवे तसे मी वागणार’, ‘मला हवे ते लिहिणार’, ‘मला मिळालेले हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे’, ‘हा माझा हक्क व अधिकार आहे’ अशा प्रकारे सहजपणे बोलले जाते. वागले जाते, पण त्याबरोबर येणाऱया ‘जबाबदारी’चे भान किती जणांना असते? आपल्या वागण्या व बोलण्याची जबाबदारी किती जण घेतात? फार कमी असतील, किंबहुना नसतीलच असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
अर्थात अशा वर्तनासाठी केवळ समाजमाध्यमेच जबाबदार आहेत असे नाही. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले. संस्कृतींमधला फरक कमी झाला. योग, खाद्यसंस्कृती वगैरे गोष्टी वगळता तिकडच्या देशांनी आपल्याकडून काय घेतले कल्पना नाही, पण आपण मात्र पेहेरावापासून अनेक गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या. त्यात पबमध्ये जाणे, मद्यपान, धूम्रपान, ड्रग्ज, तोकडे कपडे, इंग्रजी भाषा, उर्मटपणा, कोणालाही काहीही बोलणे अशा नको त्या गोष्टी अधिक प्रमाणात घेतल्या. याचा अर्थ या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नव्हत्या असे अजिबात नाही, पण त्या इतक्या सर्रास, उघडपणे केल्या जात नव्हत्या. समाजाचा धाक होता. संस्कृतीची चाड होती. आज ‘संस्कृती’ हा शब्द फॅशन म्हणून वापरला जाताना दिसतो. अर्थात पाश्चात्यांकडे अशा चुकीच्याच गोष्टी आहेत असे नाही. त्यांची शिस्त आपण घेतली नाही, त्यांची कामाप्रतिची निष्ठा आपण घेतली नाही. आपल्याला त्यांची तुटलेली घरे दिसतात, पण वर्षानुवर्षे टिकलेले संसार दिसत नाहीत. त्यांचे उच्छृंखल वागणे दिसते आणि बरेचदा आपण विशेषत तरुण मुले व अविचारी माणसे त्यालाच ‘स्वातंत्र्य’ म्हणतात.
समाजमाध्यमांच्या या काळात केवळ अमेरिका व युरोपमधलेच नाहीत, तर जपान, कोरिया वगैरे देशांतील ‘रील्स’ बघायला मिळतात. दरड कोसळून रस्त्यावर दगड पडलेले असतात. अनेक गाडय़ा ते दगड चुकवून सुसाट निघून जातात. एक गाडी थांबते. त्यातील तरुण महत्प्रयासाने हे सगळे दगड एकटय़ाने बाजूला करतो आणि मार्गस्थ होतो. आपण काय केले असते? सरकार, कॉर्पोरेशन बघून घेईल म्हणून व्हिडीओ काढत बसलो असतो आणि ते समाजमाध्यमांवर टाकत राहिलो असतो. अर्थात त्यांच्याकडेही दुर्लक्ष करणारे लोक आहेतच आणि आपल्याकडेही चांगले लोक अजूनही आहेतच.
आपल्याकडे अलीकडे दिसणाऱया या बदलाला समाजमाध्यमांबरोबरच ‘बदललेली कुटुंब व्यवस्था’देखील कारणीभूत आहे असे मला वाटते. एकत्र कुटुंब व्यवस्थेत निश्चितच काही उणिवा होत्या. ‘स्वातंत्र्य’ न मिळणे हा त्यातील सगळ्यात मोठा तोटा होता. त्यामुळे अनेक व्यक्तिमत्त्वे खुरटली. विशेषत स्त्रियांचे तर खूपच नुकसान झाले, पण या व्यवस्थेमुळे समाज एकसंध होता. परस्परांशी जोडलेला होता. समाजाचा धाक होता. पण जसे कुटुंबांचे विकेंद्रीकरण झाले तशी जुनी पिढी अडगळीत गेली. तिची अडचण होऊ लागली. त्यांचा धाक संपला. आई-वडील दोघेही नोकरीला जाणार मग मुलांवर संस्कार कोण करणार? त्यात जागतिकीकरणामुळे वेगळेच चित्र हातातल्या मोबाइल वगैरे यंत्रांत दिसू लागले. आपण जे बघतो व ऐकतो आहोत ते चांगले की वाईट हेही या मुलांना समजत नव्हते. धाक नसल्यामुळे मुले वाटेल तशी वागू व बोलू लागली. एका महिलेने एका ग्रुपवर एक व्हिडीओ टाकला आहे. एक मुलगी लोकलमध्ये समोरच्या सीटवर चपलेचे पाय ठेवून बसली आहे. संबंधित महिलेने तिला त्याची जाणीव करून दिल्यावर तिने उर्मटपणे उत्तर दिले आणि “इतकी स्वच्छता हवी असेल, तर आता ही घाण साफ कर’’ असे म्हणून निघून गेली. आपल्या व्हिडीओमुळे त्या मुलीत सुधारणा होईल अशी त्या महिलेला भाबडी आशा होती. पण तो व्हिडीओ तिच्यापर्यंत पोहोचलाच तरी तिच्या ग्रुपमध्ये त्याची चेष्टा होणारच नाही याबद्दल खात्री नाही.
केवळ सर्वसामान्य माणसे, तरुण-तरुणीच नाहीत असे बेजबाबदार वागणाऱयांत आजकालचे राजकारणीही आघाडीवर दिसतात. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स यांना मागे टाकून आता गावोगावी, खेडोपाडी छोटी छोटी चॅनेल्स सुरू झाली आहेत. काही पुढारी तर स्वतचेच कॅमेरामन घेऊन फिरतात आणि आपल्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करतात. यात काहीही सेन्सॉर होत नाही, संपादन होत नाही. ते जे बोलतात ते जसेच्या तसे आपल्यापर्यंत येते. हे बोलणे व्यवस्थित आहे, कोणाला त्यामुळे त्रास होत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण तसे नसेल तर ते फारच त्रासदायक होऊ शकते. बरे कोणी आपल्या बोलण्याची जबाबदारी घेतातच असे नाही. उलट “माझ्या बोलण्याचा विपर्यास केला’’ असे म्हणून जबाबदारी टाळण्याकडेच कल असतो.
स्वातंत्र्य ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन आपल्याला हवे तसे वागण्याची मिळालेली मोकळीक असे समजू नये. समोरच्याला वाटेल तसे बोलणे, कोणाचीही भीडभाड न ठेवणे, तोडफोड करणे, वाहने वाटेल तशी चालवणे, कोणाबद्दलही काहीही बोलणे असे करू नये. कारण आपल्याला हे स्वातंत्र्य आहे तसे समोरच्या व्यक्तीलाही ते मिळालेले असते. त्या व्यक्तीनेही तसेच वागायचे ठरवले तर ते सहन करण्याची आपली तयारी हवी. तसेच आपल्या वागण्या व बोलण्यामुळे समाजाचे नुकसान होत नाही ना, कोणी व्यक्ती आयुष्यातून उठत नाही ना याचे भान असणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच ‘हक्क’, ‘अधिकार’ म्हणून ‘स्वातंत्र्य’ उपभोगताना येणाऱया ‘जबाबदारी’चीही जाणीव ठेवायला हवी. स्वातंत्र्याच्या नावाखाली उच्छृंखल, उर्मट, बेजबाबदार वागणे केव्हाही सोपे असते, पण आपल्या वागण्याची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि किंमत कळते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List