नांदेडमध्ये भाजपचे पोलीस मुख्यालयात अतिक्रमण; प्रवेशद्वाराजवळ झळकले राजकीय बॅनर
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात होणारी अवैध बॅनरबाजी रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दोन दिवसापासून शहरात ठिकठिकाणी विनापरवानगी राजकीय बॅनर लावलेले दिसत आहेत. त्यातच कहर म्हणजे भाजपने थेट पोलीस मुख्यालयातच अतिक्रमण केले असून मुख्यालयाच्या परिसरात त्यांचे राजकीय बॅनर झळकले आहेत. त्यामुळे अवैध बॅनरबाजीला आळा कसा घालणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त थेट पोलीस मुख्यालयातही राजकीय बॅनर झळकले आहेत. थेट पोलीस मुख्यालय परिसरात बॅनर लावण्यापर्यंत बॅनरबाजांची हिम्मत पोहोचली आहे. त्यामुळे या अवैध बॅनरबाजीवर आता आळा कोण आणि कसा घालणार असा सवाल नागरिक करत आहेत.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आले. पालकमंत्री सावे हे पहिल्यांदाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी 25 जानेवारी रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागताचे शहरात ठिकठिकाणी 69 अनधिकृत बॅनर झळकले. त्याची कोणतीही रीतसर परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच शहरात अनधिकृत बॅनर हटाव मोहीम राबवत कारवाीबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या संदेशाला दोन दिवसातच राजकीय खीळ बसली आहे. सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण शहरभर लावलेले बॅनर हटविण्याची जबाबदारी त्या त्या क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रमुखांना गेल्या दोन दिवसात पार पाडता आली नाही. महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून अवैध बॅनर पाठविण्याचे कायम आदेश असले तरीही काही ठराविक वेळेत मात्र या आदेशाचे पालन होत नसल्याचे शहरवासियांच्या वारंवार निदर्शनात येत आहे.
एरवी सामान्य नागरिकांकडून तसेच किरकोळ संघटनांकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी तत्पर असतात. मात्र, सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याची तसदी या अधिकाऱ्यांना घेतली नाही. त्यामुळे इतर वेळी सामाजिक विषयाचे बॅनर तरी कशाला काढायचे असा संतप्त सवाल सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत. अशावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही मौनच बाळगले जाते, ही बाबही आता शहरवासियांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे बॅनर बाबतीत तरी महापालिकेकडून केला जात असलेला भेदभाव प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावर लागलेल्या बॅनरचा हा विषय नेहमीचाच असला तरीही प्रजासत्ताक दिनी मात्र नांदेडमध्ये आता राजकीय मंडळींनी थेट पोलीस मुख्यालयातही आपली घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा हा पोलीस कवायत पोलीस मुख्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर होतो. या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातच थेट मुख्यालयामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत होते. पोलीस मुख्यालयाच्या या प्रवेशद्वारावर 24 तास बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी कर्मचारी असतात त्यांच्या उपस्थितीत हे बॅनर लागले यात शंकाच नाही. पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात हे बॅनर पाहून शहरातील अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
पोलीस मुख्यालयासारख्या प्रशासकीय इमारतीमध्ये राजकीय बॅनर लावू कसे दिले हा प्रश्नही त्यांच्या मनात उद्भवला. मात्र सत्ताधारी राजकीय मंडळीच्या आले मना तेथे कोणाचे काही चालेना अशीच आज नांदेडची परिस्थिती आहे. महापालिकेच्या पाऊलावरच पाऊल ठेवत आता नांदेड पोलिसांनीही मौन बाळगण्याचे धोरण अवलंबिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List