सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल, नोकरी गेली; लग्नही मोडलं
सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. हा तरुण आणि आरोपी सारखा दिसतो म्हणून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पण खरा आरोपी सापडल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी सोडून दिलं. पण पोलिसांच्या या चुकीची मोठी किंमत या तरुणाला चुकवावी लागली. या तरुणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची नोकरी तर गेली. आणि त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते त्या मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न मोडल्याचे कळवले.
हिंदूस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. आकाश कनौजिया हा तरुण मूळचा छत्तीसगडचा रहिवासी. मुंबईत एका टूर कंपनीत तो काम करत होता. 17 जानेवारीला आकाशला पोलिसांचा फोन आला आणि त्याला विचारलं की कुठे आहेस. तेव्हा आकाशने पोलिसांना सांगितले की मी घरी आहे. दुसऱ्या दिवशी आकाशला ज्ञानेश्वर एक्सप्रेसने आपल्या गावी जायचं होतं. आकाशची गाडी जेव्हा दुर्ग जंक्शनला पोहोचली तेव्हा रेल्वे पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. सैफवर हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून आकाशला ताब्यात घेतलं आणि त्याला रायपूरला आणलं. आपण सैफवर हल्ला केला नाही असे आकाश वारंवार सांगत होता, पण पोलीस त्याचे काहीच ऐकत नव्हते. उलट आकाशनेच सैफवर हल्ला केला म्हणून पोलिसांनी त्याचे फोटो मीडियामध्ये व्हायरल केले.
18 जानेवारीला पोलिसांनी ठाण्यात आरोपी शरिफूल इस्लाम शेहझादला अटक केली. शरिफूलनेच सैफवर हल्ला केल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशला सोडून दिले गेले. त्यानंतर ऑफिसहून आकाशला फोन आला आणि आताच काम थांबव असं त्याला सांगण्यात आलं. तु आता कायदेशीर गोष्टीत अडकल्याने हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठांनी सांगितलं. हा धक्का आकाशला पचतो न पचतो, तोच्या त्याच्या आजीने फोन केला. मुलींच्या कुटुंबीयांनी लग्न मोडल्याचे त्याच्या आजीने सांगितले. आता भविष्यातही लग्न जमणार नाही अशी भिती आकाशने व्यक्त केली आहे. आपल्याला न्याय मिळावा म्हणून आकाश कायदेशीर लढाई लढतोय पण त्यासाठीही आपल्याकडे पैसे नसल्याचे आकाशने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List