Republic Day Traditional Buggy – टॉस उडाला अन् हिंदुस्थान-पाकिस्तान वाद मिटला; जाणून घ्या काय आहे बग्गीचा इतिहास…
हिंदुस्थानच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमत्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो हे प्रजासत्ताक दिनाचा परेड सोहळा पाहण्यासाठी ऐतिहासिक बग्गीमधून राजपथावर उपस्थित झाले. यावेळी सर्वांच्याच नजरा या ऐतिहासिक बग्गीवर स्थिरावल्या होत्या. 40 वर्ष बंद असलेली ही परंपरा 2024 पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काय आहे या बग्गीचा इतिहास?
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींसाठी या ऐतिहासिक बग्गीचा वापर 1984 सालापर्यंत करण्यात येत होता. परंतु 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर ही परंपरा बंद करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. बंद होण्यापूर्वी 1984 साली तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग यांनी या बग्गीचा वापर केला होता. परंतु सुरक्षेच्या कारणांमुळे त्यानंतर राष्ट्रपतींच्या आगमनासाठी लिमोजीन या कारचा वापर करण्यात येऊ लागला.
बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी 2014 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या बग्गीचा पहिल्यांदा वापर केला. त्यानंतर 2017 साली रामानथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंर बग्गीमधून सलामी देणाऱ्या गार्डची पाहणी केली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन सुद्दा बग्गीमधूनच झाले. त्यामुळे आगामी काळात देशाच्या प्रमुख सोहळ्यांमध्ये बग्गी देशवासियांना पहायला मिळणार हे नक्की.
बग्गीचा इतिहास फार जुना आहे. ब्रिटिश काळात हिंदुस्थानचे व्हॉईसरॉय या बग्गीचा वापर करत असे. 1947 साली जेव्हा हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा बग्गी कोणाला मिळणार? यावरून दोन्ही देशांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला, तेव्हा हिंदुस्थानचे तत्कालिन लेफ्टनंट कर्नल ठाकुर गोविंद सिंग आणि पाकिस्तानचे सैन्य अधिकारी साहबजादा याकूब खान यांनी टॉस उडवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच जो नाणेफेक जिंकेल बग्गी त्याची. हा नाणेफेकीचा कौल हिंदुस्थानने जिंकला आणि तेव्हा पासून बग्गी हिंदुस्थानात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List