एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 15 लाख कोटींचे उद्योग आणले, त्याचे काय झाले? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस दावोसला गेले पण जी गुंतवणूक झाली त्यातील बऱ्याचशा कंपन्या या भारतातल्याच आहेत असे विधान सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा 15 लाख कोटींचे उद्योग आणले त्याचे काय झाले? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दावोसला जाऊन जर गुंतवणूक आली असेल तर त्याचे स्वागतच आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते, त्यांनीही 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याची घोषणा केली होती. हे 15 लाख कोटी रुपये कुठे आलेत? आजही ते सरकारमध्ये आहेत. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकारी, पत्रकार असा मोठा लवाजमा घेऊन ते दावोसला गेले होते. 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यांचा त्यांचा दावा होता. एक रुपया तरी आला का?
तसेच दावोसमध्ये साधारणतः एक जत्रा भरलेली असते. या जत्रेमध्ये सर्वच हौशे, नवशे येत असतात. तिथे MoU होतात, प्रत्यक्ष करार होत नाहीत. आता देवेंद्र फडणवीस दावोसला गेले पण जी गुंतवणूक झाली त्यातील बऱ्याचशा कंपन्या या भारतातल्याच आहेत. त्यासाठी तिकडे जाण्याची गरज नव्हती. मग हे 10 लाख कोटींचे करार झालेत ते दाखवा की कुठे जमीन दिली? पुढच्या वर्षी परत हे दावोसला जातील तोपर्यंत यांचा काही हिशोब नाही. एकनाथ शिंदे जेव्हा दावोसला गेले होते त्या कराराचं काय झालं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं आणि आपण केलेल्या करारांविषयी महाराष्ट्राला माहिती द्यावी असेही,संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List