गुलदस्ता – बदरुद्दीन आणि…
>> अनिल हर्डीकर
संयत अभिनय कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले बलराज सहानी ज्यांनी बदरुद्दीनच्या कलेची कदर करत त्याच्यासाठी गुरुदत्तच्या ‘बाजी’ची पटकथा लिहिताना त्यात त्याच्यासाठी भूमिका लिहिली. अंगविक्षेप न करता एक श्रेष्ठ विनोदी अभिनेता म्हणून मान्यता पावलेले तेच बदरुद्दीन अर्थात ‘जॉनी वॉकर’. बलराज साहनी यांनी जॉनी वॉकर यांची चेतन आनंद, देव आनंद, गुरुदत्त यांच्याशी घडवून आणलेली भेट कितीतरी मोलाची ठरली.
प्रसंग 1
रूपतारा स्टुडियोचं आवार, हलचल चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना…
दुपारची वेळ, लंच टाईम…
याकूब, दिलीपकुमार, के आसिफ आराम खुर्चीत बसले आहेत. त्यांच्यासमोर बदरुद्दीन नावाचा एक्स्ट्रा म्हणून काम करणारा नकला करून दाखवतो आहे. कधी दारूडय़ाची, कधी जुगारी तर कधी रस्त्यावर औषधे विकणारा विक्रेता. सर्व नट मंडळी हसून हसून बेजार. जवळच असलेला बलराज साहनी ते पाहतोय.
कट टू – प्रसंग 2
रूपतारा स्टुडियोचे आवार, बलराज साहनी आणि बदरुद्दीन…
लंच टाईमनंतरची वेळ…
बलराज ः एक्स्ट्रा म्हणून तुला इथे रोजचे किती पैसे मिळतात?
बदरुद्दीन ः पाच रुपये. त्यातला एक रुपया सप्लायरला जातो.
बलराज ः त्या चार रुपयांत तू इथे नकलादेखील करून दाखवतोस?
बदरुद्दीन ः (गोंधळलेला) नाही.
बलराज ः मग इथं अशा माकडचेष्टा करत असतोस ते? लाज नाही वाटत तुला?
बदरुद्दीन ः (काकुळतेने) तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब, पण मोठय़ा लोकांना नाराज करून चालणार नाही.
बलराज ः मी तुला योग्य भूमिका मिळवून देईन. आधी तू या नकला करण्याचं वेड सोड. तुझ्यातल्या कलेचा मान ठेव.
कट टू – प्रसंग 3
बलराज बदरुद्दीनला काही समजावून सांगत आहे.
बलराज ः समजलं? मी सांगितलं तसं कर.
बदरुद्दीन होकारार्थी मन हलवतो.
कट टू – प्रसंग 4
गुरुदत्त यांचं कार्यालय…
चेतन आनंद, देव आनंद, गुरुदत्त आणि बलराज सहानी चर्चेत गुंतले आहेत आणि तेवढय़ात एक दारूडय़ा दरवानाला न जुमानता आत शिरतो. देव आनंदला पाहून काही तरी बरळतो. सर्व मंडळी हसून बेजार होतात. तो आणखीही काही बरळतो.
चेतन ः अरे याला आत कुणी सोडलं? हा दारूडा इसम आलाच कसा आत?
बलराज ः (त्या दारूडय़ाला उद्देशून) बदरुद्दीन, बस झालं.सलाम कर सर्वांना.
(बदरुद्दीन सरळ उभा राहून सगळय़ांना सलाम करतो. बलराज साहनी सोडून सगळे आश्चर्यचकीत!)
कट टू
आज या प्रसंग मालिकेला कैक वर्षे झाली. संयत अभिनय कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण असलेला, ज्याने बदरुद्दीनच्या कलेची कदर करत त्याच्यासाठी गुरुदत्तच्या ‘बाजी’ची पटकथा लिहिताना त्यात बदरुद्दीनसाठी रोल लिहिला तो बलराज सहानी, आज हयात नाही आणि अंगात उपजत गुण असलेला बदरुद्दीन जो अंगविक्षेप न करता एक श्रेष्ठ विनोदी अभिनेता म्हणून मान्यता पावला तोही आज या जगात नाही. दारूडय़ाची नक्कल केल्याने ज्याला चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडे झाले त्याने ‘जॉनी वॉकर’ नाव घेणं हे योग्यच, पण उभ्या आयुष्यात तो दारूच्या थेंबालाही शिवला नाही हे किती कौतुकास्पद!
याकूब, दिलीप कुमार, के आसिफ यांना नकला करून दाखवून त्याला काहीच मिळालं नाही, पण बलराज साहनी यांनी त्याची चेतन आनंद, देव आनंद, गुरुदत्त यांच्याशी घडवून आणलेली भेट कितीतरी मोलाची ठरली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List