‘एनआय’ची जागा घेऊ शकणार नाही
>> डॉ . गजानन शेपाळ
भावना आणि सहानुभूतींचा अभाव असलेल्या एआय तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या कलाकृतींना म्हणूनच कमी आयुष्य लाभेल असे वाटते. उलटपक्षी नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या आधारे चितारलेल्या श्रेष्ठ कलाकृती या एकमेव असल्यामुळे त्यांचे अमूल्यत्व अबाधितच राहील. एकाच वाक्यात सांगावेसे वाटते की, एआय तंत्रज्ञान हे नवीन आहे तोपर्यंत उत्सुकता वाढवेलही, परंतु एनआयशी तुलना होणार नाही, एनआयची जागा घेऊ शकणार नाही. जे चिरंतन आहे तेच चिरंजीव असते. दृश्यकलेच्या बाबतीत तर हे तंतोतंत खरे ठरते.
दृश्यकलेचा अभ्यासक आणि प्रयोगशील चित्रकार या नात्याने मला एक विधान फार जबाबदारीने करावे वाटते आहे की, कितीही आधुनिकता आली तरी जे अस्सल आहे, जे मूळ आहे किंवा जे नैसर्गिक आहे, त्याबरोबर तुलना करणं केवळ अशक्य असणार आहे. एआयच्या संदर्भात बोलायचे झालयास एआय अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ किंवा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही कधीही ‘नॅचरल इंटेलिजन्स’ किंवा ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’शी बरोबरी करू शकणार नाही, चित्रकला क्षेत्रात मात्र सुरुवातीला जरी सध्या एआय तंत्रज्ञान फार आमूलाग्र बदल घडवून आणेल अशा स्वरूपाचे वातावरण निर्माण केले जात असले तरी त्यात यश येईल अशा शक्यता फार धूसर आहेत. कारण 1) कलात्मकतेची कमतरता एआयद्वारे ज्या कलाकृती बनवल्या जातील, त्यात कलात्मकता कमी असेल. मशीनद्वारे अशा कलाकृती निर्माण केल्या जात असल्यामुळे त्यात ‘कृत्रिमता’च अधिक असेल. 2) तांत्रिकतेचा अभाव एखादी कलाकृती निर्माण करताना कलाकार त्या कलाकृती निर्माणासाठी आशयगर्भतेनुसार शैली व तंत्रांचा विचार करतो. एआयद्वारे मात्र जेवढे यंत्राला माहिती आहे त्या पलीकडे कलाकृतीत काहीच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ‘AI-ART WORK’ हे अपूर्ण किंवा अपंग असेल. 3) भावनांचा अभाव NI म्हणजे ‘नॅचरल इंटेलिजन्स’द्वारे निर्माण होणारी कलाकृती ही केव्हाही आणि कधीही एआयद्वारे म्हणजे ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’द्वारे तयार केलेल्या कलाकृतीपेक्षा सरसच ठरेल. यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही.
एआय तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या कलाकृतीची काय वैशिष्ट्ये असू शकतील? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण खालील मुद्द्यांना स्पर्श करू शकतो –
1) एआय कलाकृती निर्माण करताना आपण काही तांत्रिक प्रयोग अनेक प्रकारे करू शकतो की, ज्याद्वारे विविध परिणाम मिळू शकतील. मात्र त्यात तोच तोचपणा अधिक असेल. 2) एआय कलाकृती निर्माण करताना वेळेची बचत करता येईल. कलाकृती निर्माण करण्याचे कारखानेच सुरू होतील. त्यामुळे एकाच वेळी भरपूर कलाकृती पाहण्याची सोय होईल. 3) एआयमुळे नवनवीन Tools तंत्रज्ञानाद्वारे कलाकृती फार पटकन करता येतील. 4) एखाद्या विशिष्ट शैलीत व तंत्राद्वारे कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या कलाकृती (स्वाक्षरीसह) एआय तंत्रज्ञानामुळे हुबेहुब तयार करता येतील. त्यामुळे ज्या कलाकृती सर्वसामान्य रसिक विकत घेऊ शकणार नाहीत, त्या कलाकृती एआय सहज मिळवून देईल. मग ही घटना कितपत रचणारी असेल हे येणारा काळच ठरवेल. 5) एआयमुळे एखाद्या कलाकृतीचे विस्तारीकरण करणे सुलभ होते आहे. जसे की, लिओनार्दो दा विंची यांची ‘मोनालिसा’ एआयमुळे आता कला रसिकांकडे पाहून काहीतरी बोलायला लागलीय, तर राजा रवी वर्माची ‘हिंदू स्त्री’ आता मागे-पुढे वळून पाहू लागलीय वगैरे. ही ‘मज्जा’ किती काळ कला रसिकांना रुचणार हे येणारा काळच सांगू शकेल. 6) एआयमुळे कला शैलीची ओळख, दृश्य कलाकृतींचे पुनर्निर्माण वा कृत्रिम कला सृजन हे एखाद्या ‘प्रॉडक्शन’ कारखान्याप्रमाणे होणार आहे. हे खरंच किती दृश्य कलाकार आणि कला रसिकांना भावणार आहे, हे नजीकच्या काळावरच अवलंबून असणार आहे. एकूणच एआय आणि एनआय यांच्यात एक सुसूत्रता येणे किंवा त्या दोघांची बरोबरी करणे केवळ अशक्य आहे. कारण एआय हे मशिन्स टूल्सच्या उपयोगातून शिकता येते, तर एनआय हे मानवी मेंदू, अनुभव, शिक्षण आणि सामाजिक परिस्थिती यांच्या ‘सहयोगातून’ लाभते.
एआयमध्ये प्रोग्राम केलेले नियम आणि गणिते यावर अवलंबून असतात, तर मानवी मेंदू अधिक जटिल आणि लवचिक पद्धतीने विचार करू शकत असल्यामुळे आवश्यक बाबींचा अवलंब करू शकतो.
(लेखक दृश्यकला तज्ज्ञ, कलाविषयक लेखक आणि संशोधक आहेत.)
gajamansitaramahepat gmail.com
पहिली दोन चित्रे एआयने बनवलेली आहेत आणि उर्वरित दोन चित्रे समकालीन प्रस्थापित चित्रकारांनी (मुळगावकर आणि एस. एम. पंडित) साकारलेली आहेत. त्यातून आपल्याला कृत्रिम आणि नैसर्गिक यातील फरक दिसून येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List