AI आहे मनोहर तरी…

AI आहे मनोहर तरी…

गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार येत्या काळात 30  कोटींपेक्षा जास्त लोकांना एआयमुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. बंगळुरू शहरातील एका स्टार्टअपने आपल्या 90 टक्के कामगारांना कमी केले आणि त्यांच्या जागी एआय मदतनीस ठेवले. कंपनीच्या सांगण्यानुसार यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद तर वाढलाच, पण खर्चातदेखील 85 टक्के बचत झाली. प्रत्येक क्षेत्रात असे घडणे शक्य नसले तरी ही घटना भविष्याची चुणूक दाखवायला पुरेशी आहे.

एआय या प्रणालीचा वापर तसा जुना आहे. एखाद्या कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर फोन केल्यानंतर पलीकडून आपल्याला रेकॉर्डेड सूचना मिळत जातात आणि आपण निवडलेल्या पर्यायाप्रमाणे आपल्याला सेवा पुरवली जाते, अथवा एखाद्या वेबसाइटवर चॅटबॉटच्या मदतीने आपल्या शंका सोडवल्या जातात. ही एआयची आपल्या ओळखीतली पहिली सुरुवात म्हणायला हरकत नाही. मात्र हे तंत्रज्ञान बघता बघता संपूर्ण जगाला कवेत घेईल असा अंदाज या क्षेत्रातले मोजके जाणकार सोडले तर कोणालाही नव्हता. ChatGPTच्या आगमनानंतर लोकांना या तंत्रज्ञानाच्या अफाट कार्यक्षमतेचा अंदाज आला आणि मग या कृत्रिम बुद्धिमत्तेने नेत्रदीपक भरारी घेतली.

हिंदुस्थानात एआयची खरी ओळख साधारण कोरोना महामारीच्या काळात लोकांना होऊ लागली. रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यांना तपासण्यासाठी रोबोट वापरण्यात येते होते. मशीनच्या मदतीने लांब अंतरावर बसूनदेखील डॉक्टर रुग्णांची तब्येत तपासत होते. शरीराचे तापमान मोजत होते. आरोग्यासंदर्भात विविध तपासण्या करत होते. सरकारी आरोग्य संस्थांमधून फोनद्वारे स्वास्थ्य सूचना लोकांना घरबसल्या मिळत होत्या. अॅप्सच्या मदतीने आपल्या परिसरातील रुग्णांची माहिती मिळत होती. आवश्यक उपाययोजना काय असाव्यात त्याची तयारी करून घेतली जात होती. एका मोबाइलच्या माध्यमातून घरबसल्या मिळणाऱ्या या सर्व सुविधा बघून लोकांना या तंत्रज्ञानाचे महत्त्व कळायला या काळात खरी सुरुवात झाली.

ChatGPT च्या आगमनानंतर एका हिंदुस्थानी वकिलाचा अनुभव समाज माध्यमांवर मोठा चर्चेत आला होता. या वकील साहेबांनी ChatGPT ला वादी प्रतिवादी यांची नावे दिली, कायद्याची कोणती कलमे लावावीत ते सांगितले,मानहानीच्या रकमेचा आकडा आणि इतर माहिती पुरवली व एक मानहानीचा खटला लिहून देण्यास सांगितले. वकील साहेबांच्या शब्दात सांगायचे तर ChatGPT ने खटल्याची जी काही कागदपत्रे बनवून दिली ती वाचून खुद्द वकीलसाहेब थक्क होऊन गेले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. माझ्यापेक्षादेखील अधिक प्रभावी शब्दांत ChatGPT ने ही कागदपत्रे लिहिली होती असे ते सांगतात. इतके सुयोग्य शब्द आणि अचूक शब्दांची केलेली मांडणी पाहता, पुढील अनेक वर्षे तरी मी या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करणे शक्य नाही असे त्यांनी कबूल केले. विशेष म्हणजे काही वर्षांनीदेखील त्यांना स्पर्धा शक्य होईल का अशी शंका आहे. कारण सेल्फ लर्निंग अर्थात स्व-अध्ययनाच्या मदतीने हे तंत्रज्ञान प्रत्येक सेकंदाला स्वतःला विकसित करत आहे.

वाहतूक व्यवस्थापनापासून ते टेहळणी ड्रोनच्या मदतीने देशाच्या सीमांवर सैन्याची मदत करत असलेले हे तंत्रज्ञान अद्भुत आणि मानवी विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असले तरी या तंत्रज्ञानाचा धोका पूर्ण मानव जातीला असल्याचा दावादेखील देश-विदेशातील अनेक संशोधक करत असतात. कोरोनासारख्या भीषण रोगाच्या साथीसारखा परमाणू युद्धाचा आणि एआय तंत्रज्ञानाचादेखील मानवाला धोका असल्याचे ते ठाम शब्दांत मांडतात. संपूर्ण मानव जातीचा विध्वंस करण्याची ताकद हे तंत्रज्ञान एक दिवस मिळवेल अशी भीती ते व्यक्त करतात.

एआयच्या धोक्यासंदर्भात चर्चा करताना या क्षेत्रातील दिग्गजांनी अनेक उदाहरणे समोर ठेवली आहेत. आज एआय तंत्रज्ञानाचा वापर विविध औषधी रसायने शोधण्यासाठी केला जात आहे. या तंत्रज्ञानाची मदत घेऊन अशा प्रकारे संहारक अशी रासायनिक अस्त्रे बनवली जाण्याचादेखील धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावर एखादी गोष्ट काही क्षणांत व्हायरल होत असते. एआयच्या मदतीने विश्वासार्ह स्वरूपात खोट्या बातम्या बनवणे आणि त्या काही क्षणांत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे सहजशक्य आहे. त्याची मदत घेत समाजकंटक अत्यंत सहजपणे समाजमनाचा ताबा घेऊन देशभरात उद्रेक पसरवू शकतात. काही ठिकाणी या तंत्रज्ञानाला आणीबाणीच्या क्षणी स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाचा एक चुकीचा निर्णय मोठा गजहब माजवू शकतो. भविष्यात संरक्षण दलातील विविध शस्त्रांचा वापरदेखील एआयच्या मदतीने केला जाणार आहे. अशा वेळी या तंत्रज्ञानाने झाडलेली एखादी चुकीची गोळीदेखील दोन देशांमध्ये तणाव वाढवणारी ठरू शकणार आहे.

या तंत्रज्ञानाबद्दल जगभरात सामान्य माणसांमध्ये एक साशंक वातावरण आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे अध्यक्षदेखील या तंत्रज्ञानाचा गैरवापराबद्दल जाहीर चिंता व्यक्त करू लागले आहेत. जगभरच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अॅलन मस्क आणि या तंत्रज्ञानाला जन्माला घालणारे संशोधकदेखील या तंत्रज्ञानाच्या विकासाला संपूर्ण जगभरात काही कठोर नियम आणि कायद्याने बंधन घालण्याची मागणी करू लागले आहेत. सामान्य माणूस असो किंवा एखादा आंतरराष्ट्रीय व्यवसाय असो, वैयक्तिक माहिती ही प्रत्येकाची वैयक्तिक व खासगी मालमत्ता असते. मात्र या खासगी माहितीपर्यंत एआयच्या मदतीने पोहोचणे आता सहजशक्य होऊ लागले आहे. लोकांचे आर्थिक व्यवहार, त्यांच्या बँक खात्याची माहिती, त्यांच्या आरोग्याचे विविध अहवाल, आधार नंबर, पॅन नंबर अशी माहिती चोरून तिचा गैरवापर करण्यास खूप पूर्वीच सुरुवात झाली आहे. या माहितीच्या मदतीने आर्थिक फसवणूक करणारी एक समांतर अर्थव्यवस्था तयार झाली आहे असे म्हटले तरी हरकत नाही.

या तंत्रज्ञानाचा स्वैर वापर आणि कायद्याचे त्याला नसलेले बंधन बघता भविष्यात मोजक्या संस्थांच्या अथवा ताकदवान समूहाच्या हातात हे तंत्रज्ञान एकवटले जाण्याची भीती आहे. असे घडल्यास अराजकता, हुकुमशाही आणि वर्चस्ववाद या सर्वांना एकाच वेळी सामान्य माणसाला सामोरे जावे लागेल. ‘वर्तमान आणि भविष्य या दोघांवर प्रभाव पाडणारे एकमेव तंत्रज्ञान’ असा ज्याचा गौरवाने उल्लेख केला जात आहे, ते तंत्रज्ञान भविष्यातदेखील संरक्षक असावे आणि संहारक नसावे. जगभरातील सुजाण लोक देत असलेली हाक योग्य कानावर पडेल आणि या तंत्रज्ञानाला कायदेशीर चौकट मिळेल अशी आशा या नव्या वर्षाचा निमित्ताने करायला हरकत नाही.
(लेखक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ आहेत.)

prasad.samara gmail.com

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं बाळासाहेबांना अटक, अडवाणींनी फौज पाठवली… उद्धव ठाकरेंनी सर्वच काढलं
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा समाचार...
‘जय श्रीराम’नंतर ‘जय शिवराय’ म्हटलंच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
प्रेमाने वागाल तर उचलून देऊन, कपटाने वागाल तर… तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; ठाकरेंचा अमित शाह यांना सवाल
उद्धव ठाकरेंकडून ‘एकला चलो रे’चा नारा, नेमकं काय म्हणाले?
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरेंचं उघड चॅलेंज
रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातील आसू… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जिनके इरादे बुलंद होते है, वही चट्टानों को गिराते है, काय म्हणाले एकनाथ शिंदे