उत्सव कलेचा… मुंबईकरांच्या मनातलाच; छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल आजपासून
समस्त कलाप्रेमींना भुरळ घालणारा, शेकडो कलावंतांच्या कलात्मक ऊर्जेचा अपूर्व संगम घडवून आणणारा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल उद्या, 9 जानेवारीपासून सुरू होणार असून 12 जानेवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सुरू राहणार आहे. कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची महापर्वणी ठरलेल्या या कला महोत्सवाला मुंबईकरांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच ‘वेध’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱयांसाठी तसेच कलेची आवड असणाऱयांसाठी ‘निर्मिती’च्या माध्यमातून नानाविध कलेच्या ब्रॅण्डस्चे, कलात्मक वस्तूंचे स्टॉल वनिता समाज येथे असतील. पालक आणि चिमुकल्यांसाठी समुद्रालगत, चार दिवसांच्या गमती जमती, मजामस्ती आणि अनेक अर्थपूर्ण आनंदाने भरलेली कलाशिबिरे घेऊन ‘किड्स कार्निव्हल’ खाद्यपदार्थांच्या रेलचेलसह खास आकर्षण ठरणार आहे.
खवय्यांसाठी पर्वणी
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘क्रीडा भवन येथे ‘मुंबई फूड फेस्ट’च्या निमित्ताने अस्सल खाद्य महोत्सवाची मेजवानी, सृजनशील कलाकृती, रसिकांना मुग्ध करणारी आणि संगीताच्या तालावर थिरकायला लावणारी अभंग रिपोस्ट, श्री मोन्क्स बँड, ‘गोव्याच्या किनाऱयावर’ फेम शुभांगी केदार यांचा परफॉर्मन्स कलारसिकांचा आनंद नक्कीच द्विगुणित करणार आहे. याशिवाय निसर्गचित्रण स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात युवावर्गाचा सहभाग या महोत्सवामध्ये असणार आहे.
‘दर्यापती शिवराय’ ठरणार आकर्षण
या कला महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘दर्यापती शिवराय’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय नौदल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान सांगणारे प्रदर्शन. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ युद्धनौकांच्या प्रतिकृती, मराठय़ांचा समुद्री लढायांचा इतिहास, शिवछत्रपतींच्या जगप्रसिद्ध जगदंबा तलवार बनलेल्या पंपनीतील जुन्या शिवकालीन तलवारी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची शिवराई, इंग्रजांची शिवकालीन नाणी, अली आदिलशाहाचे लारी नावाचे अत्यंत दुर्मिळ नाणे, सिंधुसागरात बांधलेले छत्रपती शिवरायांचे अभेद्य दुर्गांचे ड्रोन छायाचित्र पाहण्याचा अपूर्व योग या प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List