ग्रंथालयात एआय
>> डॉ. विवेक पाटकर
ग्रंथालयाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंध फक्त त्या विषयावरील पुस्तके आणि इतर साहित्य संग्रहित करून वाचकांना पुरवणे असा मर्यादित नाही, तर ग्रंथालय व्यवस्थापनाची आंतरिक कामे तसेच प्रत्येक वयोगटातील वाचकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सखोल, व्यापक आणि त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे.
ग्रंथालयात आलेल्या प्रत्येक पुस्तकाची तपशीलवार नोंद ठेवणे आणि त्याचे वर्गीकरण व तालिकीकरण करणे अशा अनेक मूलभूत तांत्रिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे लेखक, शीर्षक किंवा विषय याप्रमाणे पुस्तकांचा शोध घेणे सुलभ होते. ही वैचारिक कुशलतेची कामे असून त्यासाठी पुस्तकाचा सर्वांगीण अभ्यासही गरजेचा असतो. आता मात्र उपलब्ध कृत्रिम बुद्धिगत्ता प्रणाल्या, पुस्तकाचे शीर्षक आणि काही संलग्न माहिती अंकीय स्वरूपात दिल्यास पुस्तकाचे योग्य वर्गीकरण, पाहिजे त्या प्रमाणीकृत वर्गीकरण पद्धतीप्रमाणे करून देऊ शकतात.
वर्गीकृत पुस्तके क्रमांकानुसार कपाटात ठेवणे हे दुसरे महत्त्वाचे काम असते. पुस्तकांची देव-घेव नित्य होत असल्याने हे शारीरिक श्रमाचे काम बहुधा रोज करावे लागते. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेने नियंत्रित केलेला यांत्रिक हात मदत देऊ शकतो. वाचकांनी मागितलेली पुस्तके व इतर दस्तऐवज ग्रंथालयाच्या पसरलेल्या संग्रहातून शोधून काढणे आणि नंतर त्यांच्या विशिष्ट जागांवर परत ठेवणे हे त्यामुळे अचूकपणे घडते.
काळानुरूप दुर्मिळ व जुनी पुस्तके तसेच वृत्तपत्रांतील कात्रणे हा ग्रंथालयाचा महत्त्वाचा ठेवा होत जातो. त्याचे मूल्यवर्धित अंकीकरण (डिजिटायझेशन), निव्वळ स्कॅनिंग नव्हे, करून भविष्यासाठी तो जतन करणे हे कळीचे आहे. स्वाभाविकपणे अशा विशाल अंकीय माहितीसाठ्याचे (बिग डेटाबेस) सखोल विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगत साधने वापरणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्रंथालय आणि माहिती शास्त्राच्या विश्लेषण पद्धतीने मिळू न शकणारे निष्कर्ष, आकृतिबंध पुढे येऊ शकतात. उदाहरणार्थ, विधी ग्रंथालयात असलेल्या अशा प्रचंड माहिती साठ्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता असे नियमांचे आगळेवेगळे अर्थ आणि मार्ग सुचवू शकते, ज्यांची कल्पना सहसा आपण करू शकणार नाही. डेटा मायनिंग, टेक्स्ट मायनिंग आणि वेब मायनिंग यांच्या जोडीला मशीन लर्निंग या पद्धतीने प्रशिक्षित होणाऱ्या विशिष्ट तज्ज्ञ प्रणाल्या (एक्सपर्ट सिस्टिम्स) अशी सेवा देऊ शकतात. माहितीचा वाढता ओघ बघता आगामी काळात विश्वसनीय माहिती मागणीकल्यॉला देणे हे आव्हान ग्रंथालयाला पेलावे लागणार आहे. त्याशिवाय अशा माहितीचा अनुभव घेता यावा, अशी मागणीही अपेक्षित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने आभासी वास्तव निर्माण करून तशी नवी सेवा देणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, ताडोबाच्या अभयारण्याचे वर्णन वाचतानाचा थरार प्रत्यक्षात जाणवणे अशी किमया कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे साध्य आहे. ग्रंथालये या तंत्रज्ञानाचा योग्यरीत्या उपयोग करून वाचकांना आकर्षक करू शकतात.
सार्वजनिक ग्रंथालयात लहान मुलांना पुस्तक वाचून दाखवणे, चित्रांचा अर्थ सांगणे किंवा कविता म्हणणे अशा नव्या सेवा निर्माण करणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य होत आहे.
मानवी भाषेचा संदर्भानुसार अर्थ लावण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या साधनांत आणि प्रणाल्यांत वाढत आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेत मौखिकपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील ग्रंथालयातील तसेच अन्य स्रोतांतून काढून देणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाल्या (व्हॉइस असिस्टंटस्) वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगाकरता प्रभावीपणे सेवा देतात. प्रत्येक वाचकाची गरज वेगळी असते. तरी ती समजून ग्रंथालयात उपलब्ध साहित्याची चपखल शिफारस करणाऱ्या सेवा वाचकांना समाधान देऊ शकतात
नियमानुसार ग्रंथालयातील संग्रहाची प्रत्यक्ष पडताळणी (स्टॉक टेकिंग) नियमितपणे करावी लागते. हे काम क्लिष्ट व वेळखाऊ असून बहुधा त्यासाठी काही काळ ग्रंथालय सेवा स्थगित ठेवल्या जातात. ही जबाबदारी जलद रीतीने पार पाडण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने मदतशीर ठरू शकतात. असेच दुसरे शारीरिक कष्टाचे काम म्हणजे ग्रंथालय सुरक्षा अबाधित ठेवणे. यातही यंत्रमानवसदृश व्यवस्था प्रत्येक नोंदणीकृत ग्रंथालय सदस्य आणि कर्मचारीवृंदाची ओळख अचूकपणे करून त्यांनाच फक्त प्रवेश देते.
ही चर्चा दाखवते की, ग्रंथालयातील बरीच मानवी श्रम आणि बुद्धी वापरून केली जाणारी कामे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाल्या करू शकतात. त्यामुळे शैक्षणिक व संशोधन ग्रंथालयाला भविष्यात ‘विदा केंद्र’ (डेटा सेंटर) आणि सार्वजनिक ग्रंथालयाला ‘ज्ञान केंद्र’ हे प्रगत स्वरूप देण्याचे स्वप्न साकारता येईल.
साहजिकच ग्रंथालय आणि माहिती शास्त्राच्या विविध पदवी आणि अन्य पाताक्रमांत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित अत्याधुनिक पध्दती आणि तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि तो सतत अद्ययावत ठेवणे याला पर्याय नाही. त्यामुळे नवोदित ग्रंथपालांना ग्रंथालय व माहिती क्षेत्रांत कारकीर्दीच्या भरीव संधी उपलब्ध होतील. त्यासोबत सध्या कार्यरत असलेल्या ग्रंथपाल व त्यांच्या सहाय्यकांना या नवीन बदलांना कसे आत्मसात करावे याचे प्रशिक्षण देणे हेदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ग्रंथालय समाजासाठी विश्वसनीय माहितीचा आधार देणारी संस्था, ही भूमिका परत अधिक प्रभावीपणे बजावेल अशी अपेक्षा आहे.
(लेखक गणितज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रंथालय शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List