AI – राजकीय बुद्धिबळाच्या, पटावरचा नवा बजार
>> विशाल अहिरराव
हिंदुस्थानसारख्या देशात बहुपक्षीय राजकीय यंत्रणा आहे. इथे असंख्य पक्ष आपले पाय रोवून आहेत, तर काही पक्षांचा उदय होऊन अस्तासही गेले आहेत. एखादा पक्ष उभे राहण्यामागे एखाद्या व्यक्तीची, एखाद्या विचारधारेच्या समर्थकांची अपार मेहनत असते. पण तुम्हाला असं सांगितलं तर की, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयने एखादा पक्ष स्थापन केला आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण एआयच्या युगात आपण पाऊल टाकत आहोत. इथे काही अशक्य नाही. डेन्मार्कमध्ये जगातील पहिला एआयद्वारे राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. यानंतर आता जगाच्या राजकारणात एआय किती मोठा घडवून आणू शकेल याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.
राजकीय क्षेत्रातही एआयचं महत्त्व वाढलं असून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर पक्ष-प्रतिपक्षाकडून सुरू झाला आहे. कधी कधी हा वापर थेट होताना पाहायला मिळत आहे, तर कधी समर्थकांच्या मदतीनं एआय राजकारणात भूमिका बजावू लागलं आहे.
नेता तोच, जो लोकांच्या मनावर राज्य करतो. मात्र लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी त्यांना नवनवे फंडे शोधावे लागतात. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ते आपली प्रतिमा लोकांमध्ये स्थिर करण्याच्या प्रयत्नात आपल्याला कायम दिसतात. त्यामुळेच एआय बाजारात आल्यासोबतच त्याचा वापर राजकीय क्षेत्रात त्याने शिरकाव केला. राजकारणात ब्रडिंग विषय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. काळ, परिस्थितीनुसार लोकांमध्ये आपली एक प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात राजकीय पक्ष, नेते असतात. एआयने स्क्रीप्ट रायटिंग, फोटो व्हिडीओ एडिटिंग, ग्राफिक्स अगदी सहज आणि आकर्षक केले आहे. एखाद्याची लार्जर देंन लाइफ इमेज तयार करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ लागला आहे.
राजकीय क्षेत्रात जनसंपर्क, कम्युनिकेशन हा नेत्याच्या नेतृत्वाचा श्वास आहे. या जनसंपर्कासाठी एआयचा वापर प्रत्येक पातळीवर वाढला आहे. एआय टूलचा वापर करून एखादा संदेश तयार करण्यात येतो. यानंतर त्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतं. या संदेशाला लोक कशाप्रकारे प्रतिसाद देतात ते एआयच्या मदतीने तपासलं जातं. त्यानंतर एआयच्या मदतीनेच आवश्यक अशा पॉलिसी या सर्वेक्षणाच्या आधारावर केल्या जातात. एआयच्या मदतीने राजकीय पक्ष आपल्या अजेंड्याला आवश्यक असे मत लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचा वापर करण्यात आला होता. एआयच्या निगेटिव्ह बाजू आहेत. जसे की, डीप फेक व्हिडीओ, फसव्या इमेजेस तयार करणे, लोकांमध्ये अफवा पसरवण्यास आणि अस्थिरता निर्माण करण्यास मदत होईल अशा प्रकारचे साहित्य करणे. मात्र हे सगळे एआय वापरणाऱ्या व्यक्तीच्या विचारसरणीवर आधारित आहे.
अर्थात आतापर्यंत आपण जे एआय वापरत आहोत ते बाल्यावावस्थेतील आहे. पाश्चात्य देशांमध्ये येणारा काळ लक्षात घेता नियमावली तयार करण्यात येत आहेत. जसे की, एआयला निवडणूक लढवण्याचे आणि कोणत्याही राजकीय किंवा अधिकारी पदावर राहण्याची अनुमती देण्यावर रोख आहे. असं सांगितलं जातं की, एआय एखादा राजकीय पक्ष स्थापन करण्याची क्षमता ठेवतं, तसेच मतपत्रिकेवर आपल्याला स्थान मिळवण्यासाठी लोकांची सहमतीदेखील मिळवू शकतं, इतकी क्षमता एआय तयार करू शकतं.
2022 मध्ये डॅनिश सिंथेटिक पक्षाच्या अभियानाद्वारे या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले होते. डेन्मार्कमध्ये डाव्या विचारांच्या समूहाने एक एआय चॅटबॉट बनवला, जो त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधेल. या संवादातून त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला. हे सगळं आतापर्यंतच्या एआयच्या आधारावर केलं आहे.
>> एआय अजून तर बाल्यावस्थेत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार विचार केला तर, आता केवळ प्रचार साहित्यापुरता वापरलं जाणारं एआय भविष्यात एखाद्या मतदारसंघाचं नेतृत्व करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तेव्हा एआय शाप की वरदानाच्या चर्चा करण्यापेक्षा एआयमध्ये आपण कसे प्रावीण्य मिळवू यासाठी प्रयत्न करून सकारात्मक पावलासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List