बाळासाहेबांनी मराठी माणसाला कणा दिला
>> शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार
मराठी माणसाला कणा देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्याचे मराठीपण त्यांनी टिकविले. अर्थात त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रकलेचा उपयोग करून केली. पुढे पुढे ‘मार्मिक’ मधून त्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि मराठीपण याला एक स्थान निर्माण झाले.
कोल्हापूरला 1983 मध्ये तेथील संस्थांनी व्यंगचित्रांचे संमेलन आयोजित केले होते. त्याचे अध्यक्षपद बाळासाहेब ठाकरे यांनी भूषविले होते. त्या वेळी त्यांच्या व्यंगचित्रांचे वलय होते. पूर्वी सुरक्षेचा फारसा प्रश्न नव्हता. त्यामुळे बाळासाहेब आमच्या समवेतच बसले. खूप गप्पा रंगल्या. त्या वेळी त्यांनी सर्वांना व्यंगचित्रकलेचे ‘डेमॉनस्ट्रेशन’ दिले. त्यानंतर हे संमेलन मुंबईत विलेपार्ले येथे लोकमान्य सेवा संघात झाले. तेव्हादेखील आमची भेट झाली. पुढे ‘मार्मिक’तर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन बाळासाहेबांनी मला गौरविले तो माझ्यासाठी खूप मोलाचा आणि अविस्मरणीय क्षण होता. त्या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही दोघे एकत्र भेटलो. तेव्हा त्यांनी मला विचारले, “काय, किती व्यंगचित्रे झाली?” मी म्हणालो, “300 ते 400 असतील.” हे ऐकून त्यांनी खूप समाधान व्यता केले. माझी निखळ व्यंगचित्रे त्यांना खूप आवडायची.
मराठी माणसाला कणा देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्याचे मराठीपण त्यांनी टिकविले. अर्थात त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्याकडील व्यंगचित्रकलेचा उपयोग करून केली. पुढे ‘मार्मिक’मधून त्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि मराठीपण याला एक स्थान निर्माण झाले. ‘मार्मिक’, शिवसेना आणि त्यानंतर दैनिक ‘सामना’ हे मराठी माणसाचे आधारस्तंभ ठरले.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची खासियत म्हणजे, ती राजकीय टीकाचित्रे असायची. अगदी निरक्षर माणसापर्यंत त्यांना काय म्हणायचे ते थेट पोहोचायचे. व्यंगचित्र आणि तेही राजकीय व्यंगचित्राचे माध्यम असे आहे की, जे तत्काळ पोहोचते. वेग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाचे अस्तित्य निर्माण करण्यासाठी व्यंगचित्र माध्यमाचा खूप चांगल्या रीतीने उपयोग केला. त्यावेळी माध्यमेही कलेच्या बाबतीत खूप जागरूक नसायची. व्यंगचित्रे, कार्टून यांना जमलेच तर कुठेतरी कोपऱ्यात टाकले जायचे, पण बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून ते सर्वत्र पोहोचविले. व्यंगचित्रकाराला काळाबरोबर वेगाने धावता आले पाहिजे. राजकीय टीकाचित्रे ही अत्यंत वेगात समोरच्यापर्यंत पोहोचतात. चांगले व्यंगचित्र काढायचे असेल तर तुमचे चित्रकलेचे व्याकरण मजबूत हवे, असे बाळासाहेब सांगायचे. व्यंगचित्रांची भाषा यायला हवी. ती चांगली अवगत असेल तरच ती परिणामकारक ठरते. यासाठी निरीक्षण हवे. निखळ चित्रात भोवतालचे जीवन डोकावले पाहिजे. विनोदबुद्धीबरोबरच विसंगती समजण्याची कुवतही हवी, असे बाळासाहेब म्हणत.
त्या काळी दीनानाथ दलाल, बाळासाहेब ठाकरे, शं. वा. किर्लोस्कर हे चित्रकार संपादक होते. त्यांनी वेळोवेळी व्यंगचित्रांना आपल्या माध्यमात स्थान दिले. त्या वेळी आम्ही चार-पाच व्यंगचित्रकार कार्यरत होतो. आता ही संख्या 150 च्या वर गेली आहे. जिल्हास्तरावरील दैनिकांनाही आता व्यंगचित्रे हवी असतात. ही कलेतील प्रगतीच म्हणावी लागेल.
प्रत्येक व्यंगचित्रकाराची वाट वेगळी असते. माझी व्यंगचित्रे ही शब्दविरहित आहेत. देश, प्रांतांच्या सीमा ओलांडून चित्रे हीच विश्वभाषा असते, असे मला वाटते. प्रगतशील भाषा या इतर भाषांतील शब्द स्वीकारतात. वाचक हाच सार्वभौम असतो. तो ठरवितो शब्द स्वीकारायचा की नाही ते. भाषेची सक्ती न करता ती स्वाभाविकपणे झिरपणे आवश्यक आहे. जेव्हा सिनेमा आला तेव्हा नाटक बंद होईल, असे म्हटले जात होते. मात्र आजही नाटक टिकून आहे हे नाकारता येत नाही. तशीच मराठी भाषाही टिकणार आहे. मराठी भाषा टिकविण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होतो आहे, पण पालकांनीही आपली मुले मराठी माध्यमात घातली पाहिजेत.
• शब्दांकन : मेधा पालकर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List