गुन्हे वृत्त – अटकेची भीती दाखवून लुबाडायचे, दोन जण ताब्यात
मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवत वृद्ध महिलेच्या फसवणूकप्रकरणी दोघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. प्रितइंदर अरोरा आणि गौरव खुराणा अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे सायबर ठगांना बँक खाती पुरवण्याचे काम करत होते.
बोरिवली येथे तक्रारदार राहतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो उच्च न्यायालयाच्या नोटिफिकेशन विभागाचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवले. त्याच्या विरोधात वॉरंट काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. बंगलोर येथील खासगी बँकेने तक्रार केली आहे. आधारकार्डवरून बँक खाते उघडण्यात आले आहे. बँकेला 2 लाख 73 हजार रुपये देणे बाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर ठगाने तिला स्काईप अप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. तिच्याशी विनयकुमार चौबे हे बोलणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ठगाने तिला एक फोटो पाठवला. त्याला मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात अटक केल्याचे सांगितले. त्या व्यक्तीच्या घरी काही क्रेडिट कार्ड सापडली आहे. त्यातील एक कार्ड तुमचे आहे. तुमच्या खात्यात दोन कोटी रुपये आले अशा भूलथापा मारल्या. चौकशीसाठी बंगलोर येथे यावे लागेल, असे तिला सांगितले.
तेव्हा आपण गंभीर आजाराने त्रस्त असल्याने येऊ शकत नाही, ठगाने त्यांना कारवाईची भीती दाखवून बँक खात्याचा तपशील घेतला. याचा तपास वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने याची माहिती कोणाला देऊ नका, माहिती दिल्यास कुटुंबीयांना देखील अटक करू असे त्यांना सांगितले. भीती पोटी महिलेने तिची एफडी मोडून बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले. व्हेरिफिकेशन आणि ऑडिटच्या नावाखाली पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. भीतीपोटी महिलेने 78 लाख रुपये ट्रान्स्फर केले. ऑक्टोबर महिन्यात महिलेचा मुलगा घरी आला. तिने याची माहिती मुलाला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बँक खात्याची माहिती काढून प्रितइंदर अरोरा आणि गौरव खुराणाला ताब्यात घेतले.
कोल्ड प्ले तिकिटाच्या नावाखाली महिलेला गंडा
नवी मुंबईत आज झालेल्या कोल्ड प्ले तिकिटाच्या नावाखाली ठगाने महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार महिला ताडदेव परिसरात राहतात. त्या लहान मुलाच्या पार्टीचे आयोजनाचे काम करतात. शुक्रवारी त्या घरी असताना त्याने इन्स्टाग्रामवर कोल्ड प्लेबाबत एक स्टोरी पाहिली. 19 जानेवारीला नवी मुंबईत होणाऱ्या कोल्ड प्ले इव्हेंटच्या पासबाबत त्या स्टोरीमध्ये नमूद होते. त्या इव्हेंटला जायचे असल्याने महिलेने स्टोरी खाली असलेल्या नंबरवर मेसेज केला. त्याने इव्हेंटचे तिकीट 12 हजारांऐवजी 15 हजार रुपयांना विक्री करत असल्याचे सांगितले. महिलेने तीन तिकीट हवे असल्याचे त्याला सांगितले.
सुरुवातीला महिलेने त्याला 22 हजार रुपये पाठवले. पैसे पाठवल्याचा मेसेज केल्यावर त्याने महिलेला एक क्यूआरकोड पाठवला. त्याने पैसे आले नसल्याचे तिला सांगितले. तसेच ठगाने तिला व्हॉट्सअॅपवर 45 हजार रुपयांचे बिल पाठवले. त्या बिलावरील जीएसटी क्लिअर करण्यासाठी पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. ठगाने तिला फोन करून तिकीट खरेदीबाबत पुढील प्रक्रिया होत नसल्याचे सांगितले. महिलेला विश्वास बसावा म्हणून ठगाने तिला 90 हजार रुपये पाठवल्याचा खोटा मेसेज पाठवला. पण पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर महिलेने तिच्या आईच्या नंबरवरून पुन्हा पैसे पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्या नंबरवर महिलेने फोन केला. तो नंबर बंद असल्याचे लक्षात आले. पुन्हा फोन केल्यावर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याच्या भूलथापा मारल्या.
व्यावसायिकाच्या घरी हातसफाई करणारे अटकेत
व्यावसायिकाच्या घरी हातसफाई करणाऱ्या दोघांना बोरिवली पोलिसांनी गजाआड केले. प्रकाश चिंडारिया आणि दीपक ऊर्फ लाला विद्याचल प्रजापती अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवली येथे व्यावसायिक राहतात. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. त्यामुळे ते पार्टीसाठी गेले होते. रात्री उशिरा पार्टी करून घरी आले तेव्हा घरात कोणीच नव्हते. ती संधी साधून चोरटे घरात शिरले. चोरटय़ांनी घरातील 23 लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. रात्री ते घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. याची माहिती त्यांनी बोरिवली पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी प्रकाश आणि दीपकला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
धारावीत बॉम्ब
धारावी येथे बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन शुक्रवारी मुंबई पोलिसांना आला. फोन करणाऱ्याची ओळख पटली आहे. नरेंद्र कावळे असे त्याचे नाव असून तो धारावी येथे राहतो. त्याने या पूर्वीदेखील बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. त्या प्रकरणी 2022 मध्ये नरेंद्रविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला. फोन करणाऱ्याने धारावीच्या राजीव गांधी नगर येथे बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. याची माहिती नियंत्रण कक्षाने धारावी पोलिसांना दिली. काही वेळात बॉम्बशोधक व पथक तेथे गेले. ती बॉम्बची अफवा असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास धारावी पोलिसांनी सुरू केला. बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्याची ओळख पटली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List