चंद्रपूरमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिह्यातील बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ एका वाघाला धडक दिली. त्यात वाघाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. या रेल्वे मार्गावर आतापर्यंत वाघ, बिबट्या, हरीण, चितळ, अस्वल, रानगवा आदी 50 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
विदर्भात अलीकडच्या काही महिन्यांत वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. त्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच रविवारी सकाळी रेल्वे मार्गावर एक वाघ मृतावस्थेत आढळला. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर वाघाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर झोनअंतर्गत गोंदिया-नागभीड-चांदाफोर्ट-बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्याप्त भागातून जातो. नागभीड- चांदापर्ह्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जात असून ताडोबा व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे.
रेल्वे प्रशासनाने वन्य प्राण्यांच्या भ्रमंतीचे मार्ग शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यानुसार काही ठिकाणी भूमिगत मार्ग, तर बाजूला तारेचे पुंपण करण्याचे सुचवले होते. रेल्वे प्रशासन व वन विभागाच्या समन्वयाअभावी त्यावर पुढे कोणताही निर्णय होऊ शकला नाही. तसेच रेल्वे मार्ग दुहेरीकरणही रखडलेले आहे. या मार्गाचा नागपूर-नागभीड ब्राडगेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर बल्लारपूर मार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापर होणार आहे.
राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. याबाबत वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाने समन्वयाने ठोस पावले उचलली पाहिजेत. वन्य प्राणी संरक्षणासाठी सकारात्मक मार्ग काढून निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. संजय गजपुरे, सदस्य, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे (बिलासपूर झोन)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List