326 किमी मार्गावर 11 किमीचे बोगदे, जम्मू-श्रीनगर लिंक प्रकल्पाची चाचणी पूर्ण
जम्मू आणि कश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा-बडगाम रेल्वे मार्गावरील चाचणी आज पूर्ण झाली. यावेळी 18 डब्यांची ट्रायल ट्रेन कटरा रेल्वे स्थानकातून सकाळी 8 वाजता कश्मीरच्या दिशेने रवाना झाली. तब्बल 41 हजार कोटी खर्चून बांधलेल्या या यूएसबीआरएल प्रकल्पाची एकूण लांबी 326 किमी असून या मार्गावर तब्बल 111 बोगदे आहेत. 12.77 किमी लांबीचा टी-49 बोगदा हा या प्रकल्पातील सर्वात लांब बोगदा आहे.
याच प्रकल्पांतर्गत रियासी जिह्यातील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलही उभारण्यात आला आहे. त्याची लांबी तब्बल 1315 मीटर आहे, तर नदीच्या पात्रापासून त्याची उंची 359 मीटर आहे. हा पूल उभारण्यासाठी सुमारे 20 वर्षे लागली. त्यासाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च आला.
पहिला ट्रायल रन 7 महिन्यांपूर्वी
रामबन, जम्मूमधील सांगलदान आणि रियासीदरम्यान ट्रेनची पहिली ट्रायल रन सुमारे 7 महिन्यांपूर्वी झाली होती. ही ट्रेन चिनाब ब्रिटवरूनही गेली होती, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली होती. चिनाब ब्रिज पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच असून आयफेल टॉवरची उंची 330 मीटर तर लांबी 1.3 किमी आहे.
देशातील पहिला केबल–स्टेड
या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वेने आणखी एक यश संपादन केले आहे. अंजी खड्डावरील पूल हा हिंदुस्थानी रेल्वेने बांधलेला पहिला केबल-स्टेड पूल आहे. हा पूल नदीपात्रापासून 331 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. या पुलाच्या मध्यभागी बांधलेल्या टॉवरची उंची 193 मीटर इतकी आहे. त्याला आधार देण्यासाठी 1086 फूट उंच टॉवर बांधण्यात आला आहे. हा टॉवर जवळपास 77 मजली इमारती इतका आहे. अंजी नदीवर हा पूल बांधला असून हा पूल रियासी जिह्याला कटराशी जोडतो. चिनाब पुलापासून त्याचे अंतर केवळ 7 किलोमीटर आहे. या पुलाची एकूण लांबी 725.5 मीटर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List