रायगड आणि नाशिक जिह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती, मिंधे गटाचा थयथयाट फडणवीस बॅकफूटवर
महायुती सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. परंतु त्यात नाव न आल्याने अनेक मंत्र्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली गेली. विशेषकरून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे एकाच दिवसात या दोन जिह्यांच्या पालकमंत्री पदांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचा शासन निर्णय आज सरकारने जारी केला.
रायगड जिह्याचे पालकमंत्री पद मिंधे गटाच्या भरत गोगावले यांना न देता अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. त्यावरून रायगड जिह्यात मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामासत्र सुरू केले होते. इतकेच नव्हे तर महामार्गावर रास्ता रोको केला होता. दुसरीकडे नाशिक जिह्याचे पालकमंत्री पद शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. जळगावचे भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद देण्यात आले. त्यावरूनही नाराजी होती.
पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तो निर्णय अचानक रद्द करावा लागल्याने आदिती तटकरे आणि गिरीष महाजन यांना धक्काच बसला आहे. मिंधे गटाच्या नेत्यांनी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केल्याने शिंदे यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरूनच शासन निर्णय काढून रायगड आणि नाशिकच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List