मुंबई ते रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा नॉनस्टॉप प्रवास, एका चार्जिंगमध्ये 500 किमी धावणारी इलेक्ट्रिक बस लाँच
नवी दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो’ मध्ये ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडने नव्या पिढीची ‘इलेक्ट्रिक बस’ लाँच केली. एका चार्जिंगमध्ये ही बस थोडेथोडके नव्हे तर तब्बल 500 किलोमीटर धावणार आहेत. मुंबईतून केवळ पुणे, नाशिक नव्हे तर थेट छत्रपती संभाजीनगर, कोकणातील सावंतवाडीपर्यंत ही बस एका चार्जिंगमध्ये प्रवास करु शकणार आहे. महाराष्ट्रासाठी याचे महत्व अशासाठी की ऑलेक्ट्रा कंपनीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. ई शिवाई आणि शिवनेरी बरोबरच 9 मीटरच्या छोटय़ा बसेस देखील एसटी महामंडळाला दरमहा टप्प्याटप्याने ऑलेक्ट्राकडून पुरविल्या जात आहे.
ओलेक्ट्राने नव्याने डिझाईन केलेल्या 12 मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि नवीन शैलीतील 9 मीटर सिटी आणि ब्लेड बॅटरीने सुसज्ज 12 मीटर कोच बसेस अशी नवी उत्पादने दिल्लीतील प्रदर्शनात सादर केली आहेत. या बसमध्ये असलेल्या ब्लेड बॅटरीमध्ये 30 टक्के अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता आहे, ज्यामुळे या बसेस एका चार्जिंगवर 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करू शकतात. ही बस तुलनेने हलकी आहे. 5 हजार पेक्षा जास्त चार्ज सायकलचे आयुष्य असणारी ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आगामी काळात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. एअर सस्पेंशन, व्हीलचेअर रॅम्प सारख्या सुविधांमुळे या बसेस दिव्यांगस्नेही देखील आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List