सावकारी जाचामुळे सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, मुलाचा खून करून पती-पत्नीने घेतला गळफास, पत्नीचा मृत्यू; तिघे गजाआड
व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करून आणि जमीन लिहून दिल्यानंतरही वाढीव पैशांसाठी सावकारांनी तगादा लावल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेतला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर पती बचावला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चिखलीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन सावकारांना गजाआड केले आहे.
धनराज वैभव हांडे (वय – 10) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, शीतल वैभव हांडे (वय – 41) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बचावलेले महिलेचा पती वैभव मधुकर हांडे (वय – 50, सर्व रा. सोनावणेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पांडुरंग कदम (वय – 48, रा. ताथवडे), संतोष दत्तात्रय पवार (वय – 49, रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद मेहबूब शेख (वय – 36, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली आहे. तर, वैभव यांच्याविरोधात मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी माहिती दिली. आरोपी संतोष कदम याच्याकडून फिर्यादी यांनी व्यवसायासाठी सहा लाख, संतोष पवारकडून दोन लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. आरोपी जावेद शेख याच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादी यांनी आरोपी संतोष कदम याला रकमेची परतफेड म्हणून नऊ लाख 50 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादी यांच्या नावावर असलेली एक एकर जमीनही लिहून दिली होती.
आरोपी संतोष पवारला व्याजाची दरमहा २० हजार रुपये देऊन स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. त्यानंतरही पवारने 14 लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला. आरोपी जावेद शेख याते दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी हांडे यांच्याकडे तगादा लावला. फिर्यादी हांडे यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.
सावकारांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हांडे यांनी मुलगा धनराज यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती-पत्नीने छताच्या पंख्याला गळफास घेतला. यात पत्नी शीतल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वैभव हे जिवंत असल्याचे दिसून येताच त्यांना त्वरित त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
भावाला पाठवली चिठ्ठी
शीतल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ठाण्याला राहणारा भाऊ अमित गाढवे यांना मोबाईलवर ‘सुसाइड नोट’ (चिठ्ठी) पाठवली होती. भावाने चिट्टी पाहताच चिखली पोलिसांना दूरध्वनी केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता, मुलगा धनराज बेडवर पडला होता, तर शीतल आणि वैभव गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. दोघांनाही खाली उतरवले असता, वैभव यांचा श्वास सुरू होता. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी तीन सावकारांना अटक केली आहे. फिर्यादीच्या विरोधात मुलाच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List