उद्योगनगरीत उद्योजकांकडे खंडणी मागण्याच्या घटना; दोन वर्षांत खंडणीचे 11 गुन्हे दाखल
पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरामध्ये उद्योगस्नेही वातावरण राहण्यासाठी पोलिसांनी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची दोन वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. या पथकाने मागील दोन वर्षांत खंडणीचे 11 गुन्हे दाखल केले असून 31 आरोपींना अटक केली आहे. पथकाकडून खंडणीखोरांची माहिती संकलित केली जाते. त्यांना समज देण्याचे कामही केले जाते.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयक़्तालयांतर्गत सुमारे 40 ते 45 लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी-मरकळ, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी सुमारे दोन हजार छोट्या आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत. यांसह जगाच्या नकाशावर ओळख असलेली हिंजवडी माहिती व तंत्रज्ञान (आयटी) नगरीदेखील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतच आहे. कंपन्यांतील छोटे-मोठे कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिकांमध्ये स्पर्धा असते. माथाडीच्या नावाखाली कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. असे असले तरीही कोणीही पदाधिकारी समोर येऊन तक्रार देत नाहीत. पोलिसांनी आवाहन करूनही म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे. तसेच उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 21 मार्च 2023 रोजी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना केली, तेव्हापासून या पथकाकडे खंडणीच्या 11 तक्रारी आल्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 37 आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी 31 जणांना अटक केली आहे.
दरम्यान, 14 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस आयुक्तालयात खंडणीविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
तक्रारींचे प्रमाण अत्यल्प
व्यवसाय करायचा असल्याने कंपनी मालक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कर्मचाऱ्यांना दररोज येथेच कामाला यायचे असते. कर्मचारी, कंपनीतील अधिकाऱ्यांना रस्त्यात त्रास दिला जातो. कंपनीत एखादी घटना घडवून आणली जाते. कर्मचाऱ्यांचा संप घडवून आणला जातो. त्यामुळे तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे दिसून आले. कंपन्यांनी पुढे येऊन तक्रार करावी. जो कोणी खंडणीखोराविरोधात तक्रार देईल, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकाराविरोधात तक्रार करा
व्यावसायिक वाहनचालकांकडे माथाडीच्या नावाखाली पैशांची मागणी, कंत्राटासाठी दबाव, राजकीय व्यक्ती, कामगार संघटना, माथाडी संघटनेची जबरदस्ती, भंगार विक्रीच्या कंत्रासाठी दादागिरी, सुरक्षारक्षक, वाहतूक आणि पाणी मीच पुरवणार, असा दम दिल्यास वर्गणीच्या नावाखाली जबरदस्ती केल्यास उद्योजकांना तक्रार करता येणार आहे. औद्योगिक तक्रार निवारण पथकाकडे तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक 7517751793 आणि ई-मेल आयडी [email protected] तक्रार करता येईल.
उद्योजकांना तक्रार करण्याची भीती वाटते. पोलिसांनी नाव गुप्त ठेवले जाईल, असा विश्वास उद्योजकांना दिला पाहिजे. उद्योजक, संघटनांसोबत बैठक घेऊन पथकाची माहिती देणे अपेक्षित आहे.
संदीप बेलसरे,
अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना.
सहायक आयुक्त औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे प्रमुख
उद्योजकांच्या अडीअडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची दोन वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. आता या पथकाच्या प्रमुख म्हणून एका सहायक आयुक्तांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.
उद्योजकांनी खंडणीची तक्रार देण्याबाबत सातत्याने बैठका घेतल्या जातात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे उद्योजकांनी स्वतःहून पुढे यावे, तक्रार द्यावी.
संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List