‘अब्बाला तुझ्यावर खूप अभिमान..’; सैफच्या जवळच्या व्यक्तीची भावूक पोस्ट
घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यातत गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सैफच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आले. अकराव्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून आत शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने एक कोटीची खंडणी मागत हा हल्ला केला. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. अशातच सैफची बहीण सबा पतौडीनेही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भावासाठी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
सबाने सैफसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला. त्यासोबतच लिहिलं, ‘या विचित्र घटनेनं मला खूप मोठा धक्का बसला असून मी अस्वस्थ झाले आहे. पण भाईजान, मला तुझा अभिमान आहे. कुटुंबाची काळजी घेणं आणि त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणं हे पाहून अब्बाला खूप अभिमान वाटेल. लवकर बरा हो. तुझ्याजवळ नसल्याची कमतरता जाणवतेय. मी लवकरच तुझ्या भेटीला येईन. तुझ्यासाठी प्रार्थना आणि दुआँ.’ बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सैफच्या या हल्ल्याबाबत काळजी व्यक्त केली. आर. माधवन, करिश्मा तन्ना, पूजा भट्ट, रवीना टंडन, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी, इम्तियाज अली, परिणीती चोप्रा, सेलिना जेटली, सोनू सूद, ममता कुलकर्णी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटनेचा निषेध व्यक्त केला. काही सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालयात सैफची भेट घेतली. रणबीर कपूर, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, सोहा अली खान, सिद्धार्थ आनंद हे सैफच्या भेटीला गेले होते.
सैफवर हल्ला करणारा आरोपी हा आगीपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला होता. सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीततून तो घरात शिरला होता. त्यावेळी त्याला पाहून सैफच्या घरात काम करणारी एरियामा फिलिप्स उर्फ लिमा या जहांगिरला उचलण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सैफ आणि करीना तिथे पोहोचले. त्यावेळी आरोपीने सैफवरही हल्ला केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List