मराठी माणसाला कलह करायला आवडतो, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात देवाभाऊंनी दिला आठव्या शतकातील दाखला
संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, तिथे वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. वाद-प्रतिवादातूनच खऱया अर्थाने मंथन होत असते. मराठी माणसाला कलह करायला आवडतो. त्यामुळे फार काळजी करायचे काम नाही, अशी मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठी माणूस कलहशील असल्याचे सांगणारा आठव्या शतकाचा दाखलाही फडणवीस यांनी दिला.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित तिसऱया विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनपर भाषणात फडणवीस म्हणाले, ‘वाद होतात म्हणून संमेलने आयोजित करण्याचे थांबवू नये. अशा संमेलनातूनच चांगले काम करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते.’ वादाबाबत बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठव्या शतकातील एका पुस्तकाचा दाखला दिला. ज्यात मराठी माणसाचे गुण आणि अवगुण याबाबत माहिती दिलेली आहे. ‘मराठी माणूस हा कलहशील असल्याचे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. मराठी साहित्य हे खऱया अर्थाने मराठीला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. मराठी रंगभूमीने मराठी संस्कृती टिकवून ठेवली आहे,’ असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सदानंद मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सकाळी बालगंधर्व रंगमंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये नाशिक ढोलच्या गजरात मराठमोळे फेटे बांधून ज्येष्ठ मराठी साहित्यिक, परदेशी मराठी भाषिक, कलावंत, महिला आणि युवा लेखक, विद्यार्थी सहभागी झाले.
विश्व संमेलनाला आले केवळ 75 परदेशी मराठी भाषिक
विश्व मराठी संमेलनासाठी जगभरातील 22 देशांमधून मराठी भाषिक येतील, असे सांगण्यात आले. त्यासाठी 220 परदेशी मराठी भाषिकांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात 75 जणच आल्याचे नोंदणी कक्षावर सांगण्यात आले.
‘मी पुन्हा येईन’ पिच्छाच सोडत नाही…
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाही. कुठेही गेले की ‘मी पुन्हा येईन’ आहेच. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे वाक्य म्हणतात. मागच्या काळात ते उपहासाने म्हटले जायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ बदलत असतात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे म्हटले पाहिजे, अशी टिप्पणीही फडणवीस यांनी यावेळी केली.
परदेशात संमेलन घेऊ
पुढील पाच वर्षांतील एक विश्व संमेलन परदेशात घ्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी परदेशात संमेलन घेण्याचे जाहीर केले. याबाबत साहित्यिकांशी चर्चा करून सर्वांना सोयीचे असणाऱया देशात संमेलन घेऊन मराठीचा
डंका जगभरात वाजवू, असे फडणवीस
यांनी सांगितले. इंग्लंडमधील मराठी मंडळाला येत्या 15 दिवसांत मदत आणि दिल्लीतील मराठी शाळेलादेखील मदत करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List