अल्पावधीतच ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त
कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेनं महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केलं. महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप यांच्या आशीर्वादामुळे आज मालिकेनं 100 यशस्वी भाग पूर्ण केले आहेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचं रक्षण देवीने कसं केलं, महिषासूर आणि देवीचं चाललेलं प्रदीर्घ काळ युद्ध नेमकं कसं लढलं गेलं, दैत्यमाता दितीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती.. ही आजवर माहीत नसलेली गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहेच. पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचं पती-पत्नीचं गोड नातंही पाहायला मिळत आहे.
कधीच आई होऊ शकणार नाही हा देवी पार्वतींना असलेला शाप, ते त्यांचा ‘जगदजननी’ जगन्माता हा सगळ्या विश्वाचं आईपण जपणारा प्रवास प्रत्यक्ष महादेवांनाही भावनिक करणारा होता. या शापाची आणि आईपणाची ही फारशी माहीत नसलेली मायेची गोष्ट या महागाथेची उत्सुकता वाढवणारी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कधी न पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे तुळजाभवानीच्या रूपात दिसत आहे, तर अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र महादेवाच्या भूमिकेत आहे.
या मालिकेविषयी निर्माते आणि दिग्दर्शक शशांक शेंडे म्हणाले, “आम्ही कोल्हापूरमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या मालिकेचं शूटिंग करत आहोत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीची गाथा प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आली. अशाच पद्धतीने आई तुळजाभवानीची सेवा आमच्याकडून घडत राहो.”
मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा काळे म्हणाली, “मला ही भूमिका मिळाली हे माझं भाग्यच आहे. माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी कथ्थक डान्सर असल्याने माझे काही सोशल मीडियावरचे व्हिडिओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर मला मेसेज आला आणि या भूमिकेविषयी विचारलं. तेव्हा भेटल्यावर त्यांना मी स्पष्ट बोलले की माझा अभिनय हा प्रांत नाही. मी ही भूमिका कशी साकारू शकेन? त्यांनी मला विश्वास दिला की तुम्ही करू शकता आणि काही सराव केल्यानंतर या गोष्टी जमल्याने आज मी प्रेक्षकांसमोर उभी आहे. बहुदा आई तुळजाभवानीच्या मनात असेल की ही माझ्याकडून सेवा घडावी.” ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List