सिडकोने परवडणाऱ्या घरातून सर्वसामान्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, वाशीतील घराच्या चौरस फुटाचा दर 23 हजार
शहर वसवण्यासाठी सुरुवातीला सर्वसामान्यांना पायघड्या घालणाऱ्या सिडकोने आता याच सर्वसामान्यांना नवी मुंबईतून दळणातील खड्यासारखे बाहेर फेकण्यास सुरुवात केली आहे. घरांच्या किमती अवाचे सवा वाढवून पसंतीच्या परवडणाऱ्या घरातून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वाशीमधील घराची किंमत सिडकोने 74 लाख रुपये ठेवली आहे. या घराचे क्षेत्रफळ 322 चौरस फूट आहे. त्यामुळे एका चौरस फुटाचा दर थेट 23 हजार रुपयांच्या घरात गेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडकोने 26 हजार घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली. या घरांच्या किमती सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे या किमतीकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले होते. या योजनेसाठी सुमारे एक लाख जणांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र प्रत्यक्षात किमती जाहीर झाल्यानंतर अर्जदारांचे डोळे पांढरे झाले.
किमती कमी करण्याऐवजी तिपटीने वाढल्या आहेत. वाशी येथील घराची किंमत सिडकोने 74 लाख रुपये ठेवली. याच दरात खासगी बिल्डरकडेही घर मिळत असल्याने सिडकोच्या किमतीवर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बांधकाम हाच खर्च
बांधकाम व्यावसायिक सिडकोकडून भूखंड घेतात आणि तो विकसित करतात. त्यांचे दर हे सिडकोने सध्या जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या दराच्या आसपास आहेत. सिडकोला हा प्रकल्प उभा करताना बांधकाम हाच खर्च आहे. त्यामुळे घरांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया रिअल इस्टेट तज्ज्ञ प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List