हार्ट अटॅक नाही… प्रसिद्ध अभिनेते टीकू तलसानिया यांना नेमकं काय झालं?, प्रकृती चिंताजनक का?; पत्नीची पहिली प्रतिक्रिया काय?
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे सर्वांच्याच गळ्यातील ताईत झालेले प्रसिद्ध कॉमेडियन, ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया हे रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यांना हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचीही सांगितलं जातंय. पण टीकू तलसानिया यांच्या प्रकृतीबाबतची खरी माहिती समोर आली आहे. तलसानिया यांना हार्ट अटॅक आलेला नाही, तर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं.
दीप्ती तलसानिया यांनी मीडियाशी संवाद साधताना टीकू तलसानिया यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांना हार्ट अटॅक आलेला नाही. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे. ते काल रात्री 8 वाजता एका सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं दीप्ती तलसानिया यांनी सांगितलं.
250 हून अधिक सिनेमात काम
टीकू तलसानिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. तसेच आपल्या लाडक्या अभिनेत्याला बरं वाटावं म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत. टीकू तलसानिया हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत 250 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. प्रत्येक सिनेमातील त्यांची भूमिका छाप पाडणारी अशीच राहिली आहे.
अनोख्या विनोदी शैलीने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा टायमिंग अप्रतिम होता. त्यांना विनोदी अभिनय करताना कधीच कमरेखालचे विनोद करण्याची गरज पडली नाही. जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर ते दिसले तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना त्यांनी पोटभरून हसवलंय. सिनेमांच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केलंय.
टीकू तलसानिया यांनी 1984मध्ये आलेल्या ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही सीरिअलपासून त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1986मध्ये ‘प्यार के दो पल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान सारख्या बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय.
टीकू तलसानिया यांचे सिनेमे
टीकू तलसानिया यांनी आमिर आणि सलमान खानच्या अंदाज अपना अपना, इश्क, ढोल, कितने दूर कितने पास, धमाल आदी सिनेमात काम केलंय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’मध्ये ते अखेरचे दिसले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List